आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

तरुणाची साडीने गळफास घेऊन आत्महत्या

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 28, 2026
Spread the love

पुणे : पत्नीचे लग्नापूर्वीपासून प्रेमसंबंध असून ते लग्नानंतरही सुरू होते. तसेच पत्नीच्या सततच्या जीव देण्याच्या धमक्यांमुळे तरुणाने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने हातावर “बायकोने आणि तिच्या प्रियकराने जीव घेतला” असे लिहिले होते. या प्रकरणी मांजरी पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

प्रविण दत्ता माने (वय २८, रा. झेड एच हाइट्स, मांजरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याची आई ललिता दत्ता माने (वय ४८) यांनी मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यावरून पोलिसांनी प्रणाली प्रविण माने ऊर्फ प्रणाली जगन्नाथ जाधव (वय २०) आणि सुमीत जाधव (दोघे रा. गाधवड, ता. लातूर, जि. लातूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रविण माने याचा प्रणाली हिच्याबरोबर अरेंज मॅरेज पद्धतीने २० मे २०२५ रोजी गाधवड येथे विवाह झाला होता. लग्नानंतर ते एकत्र राहत होते.

२० जुलै २०२६ रोजी प्रणाली माने कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेली. तिच्या बेपत्ता झाल्याची तक्रार मांजरी पोलीस ठाण्यात देण्यात आली होती.

त्यानंतर तिचे आई-वडील पुण्यात आले. दुसऱ्या दिवशी प्रणाली माने मांजरी पोलीस ठाण्यात आली. तिने सासू व पती त्रास देत असल्याची तक्रार केली तसेच त्यांच्यासोबत राहायचे नसल्याचे पोलिसांना सांगून ती आई-वडिलांसोबत निघून गेली.

त्यानंतर प्रविण माने याने आपल्या आईला सर्व हकीकत सांगितली. प्रणालीचे लग्नापूर्वीपासून सुमीत जाधव याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे तसेच ही बाब लग्नानंतर दिवाळीच्या सुमारास त्याला समजल्याचे त्याने सांगितले.

लग्नानंतरही त्यांचे संबंध सुरू असल्याचे त्याच्या निदर्शनास आले होते. तसेच प्रणाली सतत त्याच्याशी भांडत असे आणि “मी तुझ्यासोबत राहणार नाही, जीव देईन,” अशी धमकी देत असल्याचेही त्याने आईला सांगितले होते.

२३ जुलै २०२६ रोजी सकाळी प्रविणने बेडरूमचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी प्रविणने साडीने गळफास घेतल्याचे आढळून आले. त्याच्या हातावर “बायकोने आणि तिच्या प्रियकराने जीव घेतला” असे लिहिले होते.

तसेच बेडवर त्याने कागदावर सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. प्रविण माने यांच्या अंत्यसंस्कारानंतर त्यांच्या आईने फिर्याद दिली असून, या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे करीत आहेत.