पूर्ववैमनस्यातून भावंडांवर खुनाचा प्रयत्न
मार्केटयार्डमधील आंबेडकरनगरमधील घटना : दोघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पूर्ववैमनस्यातून दोघांनी भावंडांवर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला केल्याची घटना मार्केटयार्ड परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथे घडली. या प्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी दोघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
आशुतोष नाना क्षीरसागर (वय २७) आणि ऋषिकेश नाना क्षीरसागर (वय २६, दोघे रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
तर आरमान समीर शेख (वय २५) आणि शाहरुख ऊर्फ कल्लू शेख (वय २७, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) यांच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत आशुतोष क्षीरसागर यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशुतोष आणि ऋषिकेश यांच्या नातेवाईकांचे २६ जुलै रोजी निधन झाले होते.
दोघेही अंत्यविधीसाठी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मार्केटयार्ड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर परिसरातून निघाले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना अडवले.
पूर्ववैमनस्यातून आरोपींनी आशुतोष यांच्या डोक्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. तसेच शाहरुख याने ऋषिकेश याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
त्यानंतर त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस आणि हातावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक बसवराज माळी करीत आहेत.
