आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

कृष्णा आंदेकरचा गेम करण्याचा कट उघडकीस

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 28, 2026
Spread the love

पुणे : आंदेकर टोळीतील सदस्यांना सहकारनगर येथील मोक्का गुन्ह्यातील सुनावणीसाठी न्यायालयात आणल्यानंतर त्यांना पुन्हा धुळे व नंदुरबार कारागृहात नेत असताना सुरज ठोंबरे टोळीतील गुंडांनी पोलीस व्हॅनचा पाठलाग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी संशय आल्याने त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता, चाकणजवळ दुचाकी सोडून दोघेजण पळून गेले. भारती विद्यापीठ पोलिसांनी रेकी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे.

वेदांत रोहित सावंत (वय २१, रा. वनराई कॉलनी, धनकवडी) आणि अथर्व दत्तात्रय खोपडे (वय २१, रा. गुजरवाडी, कात्रज, मूळ रा. नाझरे, ता. भोर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

यांच्यासह सुरज अशोक ठोंबरे (वय २४, रा. नाना पेठ), मानव शरद ढमाले (वय २४, रा. सावरकर चौक, धनकवडी), धीरज लखारा (रा. धनकवडी) व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट २ मधील पोलीस उपनिरीक्षक तेजश्री धनाजी पवार (वय ३२) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदेकर टोळीतील कृष्णा आंदेकर, स्वराज वाडकर आणि तुषार वाडकर यांना सहकारनगर येथील मोक्का गुन्ह्याच्या सुनावणीसाठी धुळे व नंदुरबार कारागृहातून शिवाजीनगर न्यायालयात आणण्यात आले होते.

न्यायालयीन कामकाज संपल्यानंतर त्यांना पुन्हा धुळे व नंदुरबार कारागृहात पोलीस व्हॅनमधून नेण्यात येत होते. त्यावेळी दुचाकीवरील दोघेजण सातत्याने पोलीस व्हॅनच्या पुढे-मागे फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलीस अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी त्या दोघांवर लक्ष ठेवले. न्यायालयाच्या आवारातही हे दोघेजण संशयास्पदरीत्या घुटमळत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

त्यानंतर चाकणजवळील कुरुळी येथे पोलीस व्हॅन थांबवून त्यांना बोलावण्यात आले. मात्र, पोलीस व्हॅन थांबल्याचे आणि पोलिसांनी बोलावल्याचे पाहताच त्यांनी दुचाकी जागेवरच सोडून पळ काढला.

या दुचाकीची माहिती बंदोबस्तावरील पोलिसांनी गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास करून वेदांत सावंत व अथर्व खोपडे यांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर कृष्णा आंदेकर, स्वराज वाडकर आणि तुषार वाडकर यांच्या खुनाचा कट उघडकीस आला.

पोलिसांच्या तपासात वेदांत सावंत, अथर्व खोपडे आणि धीरज लखारा यांनी मानव ढमालेच्या सांगण्यावरून ही रेकी केल्याचे निष्पन्न झाले. अथर्व खोपडे हा पिस्तूल घेऊन शिवाजीनगर न्यायालयापासून दुचाकीवरून पोलीस व्हॅनचा पाठलाग करत होता.

तर इतर आरोपी वेळोवेळी आंदेकर व वाडकर यांच्या वाहनताफ्याच्या हालचाली, प्रवासातील ठिकाणे आणि पोलीस बंदोबस्ताची माहिती फोनवरून देत होते. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी करत आहेत.