शंकरराव पाटील महाविद्यालयात विद्यार्थी संवाद व प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम येथे आजीवन अध्ययन व विस्तार विभागांतर्गत विद्यार्थी संवाद व प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये कौशल्यविकास, व्यक्तिमत्त्व विकास आणि आजीवन शिक्षणाची प्रेरणा जागृत करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्रा. आश्विन रांजणीकर उपस्थित होते.
त्यांनी आजच्या स्पर्धात्मक आणि वेगवान युगात आजीवन अध्ययनाचे महत्त्व अधोरेखित करत, विद्यापीठाच्या विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना रोजगार, कौशल्यविकास आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या संधी कशा उपलब्ध होतात, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श महाविद्यालय, उमरगा येथील इंग्रजी विभागप्रमुख डॉ. सुधीर मठपती उपस्थित होते. तसेच विद्या विकास मंडळ, पाथरूडचे सहसचिव डॉ. संतोष शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. अनुराधा जगदाळे होत्या. यावेळी महाविद्यालयाचे समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. तानाजी बोराडे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. गोकुळ सुरवसे, डॉ. नितीन पडवळ तसेच आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. श्यामसुंदर आगे यांचीही उपस्थिती होती.
यावर्षी आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठी एकूण ११३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. यशस्वीरित्या अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मनोगत डॉ. श्यामसुंदर आगे यांनी केले.
सूत्रसंचालन डॉ. राजश्री तावरे यांनी प्रभावीपणे केले, तर डॉ. शीतल अलगुंडे यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
