आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात ‘सीबीआय’चे दोषारोपपत्र

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 29, 2026
Spread the love

पुणे : ‘नीट-यूजी २०२६’ पेपरफुटी प्रकरणातील १३ आरोपींविरुद्ध केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) दिल्लीतील विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. पेपरफुटी प्रकरणातील चार आरोपी पुण्यातील असून, शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहराचा या प्रकरणात केंद्रबिंदू असल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणात परीक्षा प्रक्रिया राबविणाऱ्या राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए)शी संबंधित विषयतज्ज्ञ, मध्यस्थ आणि शिकवणी वर्गांच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

३ मे रोजी झालेल्या ‘नीट’ परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याची तक्रार केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाने नोंदविली होती. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले.

सीबीआयने पुणे, लातूर, राजस्थान, हरियाणा, दिल्लीसह देशभरात छापे टाकून आरोपींना अटक केली होती. या कारवाईदरम्यान लॅपटॉप, मोबाईल फोन तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली.

याशिवाय आरोपींची बँक खातीही गोठविण्यात आली. जप्त केलेल्या लॅपटॉप, संगणक आणि मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली.

या तपासात परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका फुटल्याचे निष्पन्न झाले असून, प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती सीबीआयने दिली आहे.

या प्रकरणात पुण्यातील विषयतज्ज्ञ मनीषा मांढरे, मनीषा हवालदार, मध्यस्थ मनीषा वाघमारे, लातूरचे प्रल्हाद कुलकर्णी, क्लास संचालक शिवराज मोटेगावकर, प्रा. तेजस शहा तसेच मध्यस्थ डॉ. मनोज शिरुरे, धनंजय लोखंडे, शुभम खैरनार, यश यादव, मांगीलाल बिवाल, विकास बिवाल आणि दिनेश बिवाल यांना अटक करण्यात आली होती.