पद्मावती हायस्कूलच्या लिफ्टमध्ये महिला अडकली
अग्निशमन दलाच्या जवानांनी केली सुखरूप सुटका; दोन मजल्यांच्या मधोमध लिफ्ट अडकली
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : वीजपुरवठा खंडित झाल्याने पद्मावती हायस्कूलमधील चार मजली इमारतीतील लिफ्टमध्ये एक महिला अडकली होती. वीजपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतरही लिफ्ट सुरू न झाल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी मदत करून महिलेला सुखरूप बाहेर काढले. शाळेतील मावशी सुमारे २० ते २५ मिनिटे लिफ्टमध्ये अडकून पडल्या होत्या.
पिसोळी येथील पद्मावती हायस्कूलमध्ये बुधवारी सकाळी ८.४० वाजता ही घटना घडली. माहिती मिळताच कोंढवा अग्निशमन केंद्राचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. शाळेत काम करणाऱ्या या मावशी २० ते २५ मिनिटे लिफ्टमध्ये अडकल्याने घाबरल्या होत्या. जवान सुभाष खाडे यांनी बाहेरून आवाज देत त्यांना धीर दिला.
लिफ्ट हायड्रॉलिक असल्यामुळे बचावकार्य करताना अडचणी येत होत्या. मास्टर चावीच्या सहाय्याने लिफ्टचा दरवाजा उघडल्यानंतर लिफ्ट दोन मजल्यांच्या मधोमध अडकल्याचे निदर्शनास आले. तसेच, लिफ्टच्या वरच्या बाजूस स्वतंत्र लिफ्ट रूम नसल्यामुळे लिफ्ट वर किंवा खाली हलवून महिलेला बाहेर काढणे शक्य नव्हते. त्यामुळे तांत्रिक कौशल्याचा वापर करून लिफ्टचा आतील दरवाजा उघडण्यात आला आणि अडकलेल्या महिलेला अतिशय सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले.
महिला बाहेर आल्यानंतर काही काळ घाबरलेल्या अवस्थेत होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना धीर देत सांत्वन केले. तसेच, लिफ्टच्या सुरक्षित वापराबाबत शाळेच्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शाळेचे प्राध्यापक पाटील यांनी सर्व जवानांचे गुलाबपुष्प देऊन आभार मानले.
या बचावकार्यात कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्राचे जवान सुभाष खाडे, पाटील, महेश फडतरे, फायरमन रितेश मोरे, संदीप कवडे, संतोष माने, प्रसाद शिंदे तसेच चालक बाबूराव जाधव यांनी सहभाग घेतला.
