आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

ऑनलाईन कार खरेदी पोलिसाला पडली महागात

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 29, 2026
Spread the love

पुणे : लहान मुलांसाठीची टॉय कार ऑनलाईन खरेदी करणे एका पोलिसाला चांगलेच महागात पडले. अवघ्या २,५०० रुपयांच्या खेळण्याच्या कारसाठी त्याने तब्बल ३ लाख ७९ हजार ७२१ रुपये गमावले. या प्रकरणी ‘सरदारजी टॉय शॉप’ या नावाच्या सोशल मीडिया अकाऊंटविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शिवाजीनगर पोलीस लाईन परिसरातील एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १७ ते २४ जुलै २०२६ या कालावधीत घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती पोलीस अंमलदार असून ते इन्स्टाग्रामवर रील्स पाहत असताना त्यांना लहान मुलांच्या खेळण्यांच्या रील्स दिसल्या. त्यामध्ये ‘सरदारजी टॉय शॉप’ या अकाऊंटवरील एक टॉय कार त्यांना पसंत पडली. रीलमध्ये दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर संबंधित व्यक्तीने कारची किंमत २,५०० रुपये असल्याचे सांगितले. सुरुवातीला त्याने ५०० रुपये युनियन बँकेच्या खात्यावर पाठविण्यास सांगितले.

त्यानंतर २३ जुलै रोजी व्हॉट्सअॅप कॉल करून, “मी चाकण येथे आलो असून कार घरपोच पाठविण्यासाठी ट्रॅकिंग लोकेशन सक्रिय करण्यासाठी १,९९९ रुपये स्कॅनरद्वारे पाठवा,” असे सांगितले. फिर्यादीच्या पतीने त्याप्रमाणे पैसे पाठविले. मात्र, पैसे मिळाले नसल्याचे सांगून आरोपीने दुसरा मोबाईल क्रमांक देत त्यावरून रिफंड मिळेल, असे सांगितले. त्यानुसार त्यांनी ४,१५० रुपये पाठविले.

यानंतरही पैसे मिळाले नसल्याचे सांगत आरोपीने वारंवार वेगवेगळ्या क्रमांकांवर पैसे पाठविण्यास सांगितले. “सर्व पैसे एकत्र रिफंड करू,” असे आमिष दाखवत त्याने वेळोवेळी एकूण ३ लाख ७९ हजार ७२१ रुपये उकळले. मात्र, ना पैसे परत मिळाले, ना टॉय कार मिळाली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.