आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बार्शीत मध्यरात्री पोलिसांची धडक, कुंटणखान्यावर छापा

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 29, 2026
Spread the love

बार्शी : बार्शी शहर पोलिसांनी अनैतिक मानवी व्यापाराविरोधात धडक कारवाई करत बायपास रोड परिसरातील छेडा प्लॉट येथील एका घरावर छापा टाकून बेकायदेशीर कुंटणखान्याचा पर्दाफाश केला. या कारवाईत पश्चिम बंगाल राज्यातील ३३ वर्षीय पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून कुंटणखान्याचा मॅनेजर सादिक युसूफ सय्यद (वय २५, रा. बारंगुळे प्लॉट, बार्शी) याला अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून रोख रक्कम, मोबाईल फोन व ऑनलाइन क्यूआर कोड स्कॅनरसह एकूण ₹ २१,३०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांना त्रिवेणी मंगल कार्यालयाच्या पाठीमागे, छेडा प्लॉट, बायपास रोड परिसरात मनीषा औदुंबर राऊत हिच्या राहत्या घरात बेकायदेशीरपणे कुंटणखाना चालवून महिलांकडून सक्तीने देहव्यापार करून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या आदेशाने दोन पंच व बनावट ग्राहक (डिकॉय कस्टमर) यांच्या मदतीने छापा कारवाईचे नियोजन करण्यात आले.

दि. २९ जुलै २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे १२.१५ वाजता बनावट ग्राहकाकडून ठरलेला संकेत मिळाल्यानंतर पोलीस पथकाने संबंधित घरावर छापा टाकला. यावेळी तेथे पश्चिम बंगाल राज्यातील ३३ वर्षीय महिला आढळून आली. चौकशीत तिला चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून बार्शीत आणण्यात आले असून, धमकावून व बळजबरीने देहव्यापार करण्यास भाग पाडण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी तिची सुटका करून पुढील कार्यवाही सुरू केली.

या प्रकरणी सादिक युसूफ सय्यद याला अटक करण्यात आली असून मनीषा औदुंबर राऊत उर्फ मनीषा संजय कुटे व औदुंबर अजिनाथ राऊत (दोघेही रा. छेडा प्लॉट, बायपास रोड, बार्शी) हे आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांच्या नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अभय माकणे, सहाय्यक पोलीस फौजदार अजित वरपे, पोहेकॉ प्रविण साठे, कोतवाल, पोकॉ अंकुश जाधव, कादर तांबोळी, सचिन देशमुख, बाळकृष्ण मुठाळ, रामेश्वर मस्के, अवि पवार, राहुल उदार, अजीज शेख, राऊत व प्रल्हाद अकुलवार यांनी यशस्वीपणे पार पाडली.

बार्शी शहर व परिसरात कुठेही बेकायदेशीर कुंटणखाने, अनैतिक देहव्यापार किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास नागरिकांनी तात्काळ बार्शी शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा डायल ११२ वर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे आवाहन बार्शी शहर पोलिसांनी केले आहे.