सातबारा उताऱ्यावर नाव लावून देण्याच्या आमिषाने फसवणूक
महसूल, जिल्हाधिकारी कार्यालयात ओळखीचा बहाणा : मांजरीमधील घटना
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सातबारा उताऱ्यावरून कमी झालेले नाव पुन्हा लावून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची २६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत कोद्रेनगर येथील ४३ वर्षीय नागरिकाने मांजरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रसाद उद्धव शिरसाठ (वय ५०, रा. अमेय सोसायटी, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे पुणे-सोलापूर रस्त्यावरील शेवाळवाडी परिसरात राहतात. तक्रारदाराचे नाव वडिलोपार्जित मालमत्तेच्या सातबारा उताऱ्यावरून कमी झाले होते. आरोपीशी त्यांची २०२२ मध्ये ओळख झाली होती. आरोपीने महसूल विभाग तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख असल्याची बतावणी केली होती.
सातबारा उताऱ्यावरून कमी झालेले नाव पुन्हा लावून देण्यासाठी पैसे द्यावे लागतील, असे सांगून आरोपीने गेल्या चार वर्षांत त्यांच्याकडून वेळोवेळी २६ लाख रुपये घेतले.
मात्र, आरोपीने सातबारा उताऱ्यावर नाव लावून न दिल्याने तक्रारदाराने त्याच्याकडे विचारणा केली. त्यावेळी आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच पैसे परत मागितल्यानंतरही त्याने टाळाटाळ सुरू केली. आपली दिशाभूल करून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने नुकतीच मांजरी पोलिसांकडे फिर्याद दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नवनाथ बिनवडे करीत आहेत.
