आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

त्या ‘सिया’ने पोलीस पाटलाची केली ५६ लाखांची फसवणूक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 29, 2026
Spread the love

पुणे : पुण्यातील तरुण उद्योजक केतन अगरवाल याला सिया गोयल हिने लोहगड येथील दरीत ढकलून खून केल्याच्या गुन्ह्याची संपूर्ण देशभर चर्चा झाली होती. त्याचप्रमाणे एका ‘सिया’शी मुळशी तालुक्यातील एका पोलीस पाटलाचा संपर्क झाला. या ‘सिया’ने त्यांची तब्बल ५६ लाख रुपयांची फसवणूक केली.

याप्रकरणी संबंधित पोलीस पाटलाने पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळशी तालुक्यातील हे पोलीस पाटील इन्स्टाग्रामवर रील्स पाहत होते. त्यावेळी एका जाहिरातीला भुलून त्यांनी त्यावरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. स्वतःचे नाव ‘सिया’ असल्याचे सांगणाऱ्या तरुणीने मुंबईतील एका शेअर ट्रेडिंग कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष तिने दाखविले.

त्यानंतर त्यांना एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील करून घेण्यात आले आणि त्यांचे ऑनलाइन खाते तयार करण्यात आले. सुरुवातीला त्यांनी काही रक्कम गुंतविल्यानंतर त्यांना त्यावर परतावा मिळाला. त्यामुळे त्यांचा विश्वास बसला. त्यानंतर वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत त्यांच्याकडून पैसे पाठवून घेण्यात आले.

त्याप्रमाणे डिसेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत त्यांनी १३ व्यवहारांद्वारे एकूण ५६ लाख रुपये गुंतविले. त्यांच्या ऑनलाइन खात्यात गुंतवणुकीचे मूल्य तब्बल १० कोटी रुपये झाल्याचे अॅपवर दाखविले जात होते.

यानंतर त्यांनी पैसे विथड्रॉ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना पैसे काढता आले नाहीत. त्यांनी सिया हिच्याशी संपर्क साधला असता, तिने सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून आणखी ३० लाख रुपये भरण्यास सांगितले. त्यांच्याकडे तेवढी रक्कम नसल्याने त्यांनी, “मी जमा केलेल्या पैशांतून ती रक्कम वजा करून उर्वरित पैसे परत करा,” अशी विनंती केली. मात्र, त्यानंतर त्यांना व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढून टाकण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.