आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

तपासाऐवजी विश्रामबाग पोलिसांची पर्यटनस्थळी मौजमजा

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 30, 2026
Spread the love

पुणे : कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यात घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी फिर्यादी महिलेला सोबत घेऊन तपास करण्याऐवजी सातारा येथील पर्यटनस्थळी मौजमजा करणाऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षकासह तिघा पोलिसांना अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी दोन वर्षांसाठी वार्षिक वेतनवाढ रोखण्याची शिक्षा सुनावली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मध्यरात्री एक वाजता पुण्यात परत आल्यानंतर या पोलिसांनी फिर्यादी महिलेला तिच्या घरी सोडण्याऐवजी नारायण पेठ पोलीस चौकीबाहेर एकटीला सोडून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक स्वरूपा नाईकवाडे, पोलीस हवालदार श्रीहरी पाटील आणि पोलीस अंमलदार कोमल कांबळे अशी शिक्षा झालेल्या पोलिसांची नावे आहेत.

हे तिघेही विश्रामबाग पोलीस ठाण्यात नियुक्त होते. फिर्यादी महिलेने केलेल्या तक्रारीची चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

विश्रामबाग पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल असून, त्या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नाईकवाडे यांच्याकडे होता.

घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी ४ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता फिर्यादी महिलेला स्वारगेट एसटी स्थानकात बोलावण्यात आले.

प्रत्यक्षात मात्र तिला सोबत घेऊन हे तिघेजण सकाळी साडेदहा वाजता खासगी वाहनाने सातारा येथे गेले. सातारा येथे पोहोचल्यानंतर नाईकवाडे यांनी स्थानिक पोलीस ठाण्याला कळवून त्यांची मदत घेऊन तपास करणे आवश्यक होते.

मात्र, तसे न करता त्यांनी तेथील कणसे ढाब्यावर हजेरी लावली. त्यानंतर दुपारी सव्वा तीन वाजता ते शाहूपुरी पोलीस ठाण्यात गेले. पंचनामा करण्यासाठी गेले असताना आजूबाजूच्या रहिवाशांकडे किंवा घटनास्थळी उपस्थित व्यक्तींकडे कोणतीही चौकशी केली नाही.

घटनास्थळाचा पंचनामा करून त्यांनी तत्काळ पुण्याकडे परतणे अपेक्षित होते. मात्र, तसे न करता त्यांनी साताऱ्याजवळील कास पठार व इतर प्रेक्षणीय स्थळांना भेट दिली.

फिर्यादी महिलेने आपली आई आजारी असून ती घरी एकटी असल्याने लवकर घरी जाणे आवश्यक असल्याचे सांगितले. तरीही पोलिसांनी तिच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले.

चौकशीत त्यांनी प्रेक्षणीय स्थळांचा आनंद घेतल्याचे निष्पन्न झाले. परत येताना पोलीस अंमलदार कोमल कांबळे यांच्या सातारा येथील निवासस्थानी जेवणासाठी थांबले.

त्यानंतर मध्यरात्रीनंतर एक वाजता ते पुण्यात आले. पुण्यात आल्यानंतर फिर्यादी महिलेला तिच्या घरी सोडण्याऐवजी सुरुवातीला तिला स्वारगेट येथे सोडण्याचा प्रयत्न करण्यात आला.

महिलेने विनंती केल्यानंतर तिला नारायण पेठ पोलीस चौकीबाहेर मध्यरात्री एकटीला सोडण्यात आले.