जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक
राजीव गांधी रुग्णालयातील निवृत्त परिचारिकेचे पती, मुलगा : लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाई
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून राजीव गांधी रुग्णालयातील परिचारिकेने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची ३५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी परिचारिका व तिच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मीनगर पोलिसांनी तिचा पती व मुलाला अटक केली आहे.
संतोष अंकुश तायडे (वय ६५), जॉय संतोष तायडे (वय २५) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
स्टेला संतोष तायडे, एंजेल संतोष तायडे (सर्व रा. गुलमोहर सोसायटी, बकोरी फाटा, वाघोली) अशी गुन्हा दाखल झालेल्या इतरांची नावे आहेत.
हा प्रकार जून २०२४ ते जुलै २०२५ दरम्यान घडला आहे. एका महिलेने लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टेला तायडे या राजीव गांधी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत होत्या. त्या सध्या निवृत्त झाल्या आहेत. त्यांनी रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, ‘‘आम्ही कंपन्यांमध्ये, बँकेत गुंतवणूक करतो. आमच्याकडे गुंतवणूक केल्यास जादा परतावा देऊ,’’ असे आमिष दाखवले. फिर्यादी व इतरांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून ३५ लाख २४ हजार २५० रुपये घेतले.
गुंतवणूक केल्यानंतर वर्षभराने या कर्मचाऱ्यांनी परताव्याची मागणी केली. तेव्हा सुरुवातीला त्यांनी टाळाटाळ केली.
फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांनी वारंवार पैसे मागितल्यानंतर स्टेला तायडे हिचा पती संतोष तायडे, मुलगा जॉय व मुलगी एंजेल तायडे यांनी त्यांना शिवीगाळ करून दमदाटी केली. तेव्हा फिर्यादी यांनी पोलिसांत तक्रार करणार असल्याचे सांगितले.
त्यावर स्टेला तायडे हिने, ‘‘पोलिसांत तक्रार केल्यास गुंतवणुकीची रक्कम परत देणार नाही व तुम्हाला बघून घेईन. नाहीतर माझ्या जीवाचे बरे-वाईट करून घेईन,’’ अशी धमकी दिली. त्यामुळे फिर्यादी काही काळ गप्प राहिल्या. तरीही पैसे न दिल्याने त्यांनी शेवटी लक्ष्मीनगर पोलिसांकडे तक्रार दिली.
सहायक पोलीस निरीक्षक लिंगाडे यांनी सांगितले की, ‘‘आम्ही दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. आमच्याकडे आतापर्यंत ७ ते ८ जणांनी फसवणुकीची तक्रार दिली आहे. तायडे कुटुंबाने आणखी काही जणांची फसवणूक केली असल्याची शक्यता आहे. ज्यांची फसवणूक झाली आहे, त्यांनी लक्ष्मीनगर पोलिसांशी संपर्क साधावा,’’ असे आवाहन त्यांनी केले आहे.
