मैत्रीचा गणपती : समाजाला जोडणारा सोहळा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यातील टिळक रोड परिसरात छाजेड परिवाराच्या वतीने गेल्या १९ वर्षांपासून आयोजित केला जाणारा “मैत्रीचा गणपती” हा उपक्रम आज केवळ गणेशोत्सवापुरता मर्यादित न राहता मैत्री, आपुलकी, सामाजिक बांधिलकी आणि एकोप्याचे प्रतीक बनला आहे.
मनोज व मुकेश छाजेड यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमात दरवर्षी नातेवाईक, मित्रपरिवार, व्यावसायिक, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांना विशेष आमंत्रित केले जाते.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वांना एकत्र आणून आपुलकीचे संबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जातो. या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आमंत्रित मान्यवरांच्या हस्ते श्री गणरायाची आरती करण्यात येते.
यानंतर छाजेड परिवाराच्या वतीने आलेल्या मान्यवरांचा सन्मान करून त्यांचे स्वागत केले जाते. त्यामुळे गणपतीचे दर्शन, आरती आणि स्नेहमेळावा असा या उपक्रमाचा सुंदर संगम पाहायला मिळतो.
गेल्या १९ वर्षांत पुण्यातील विविध क्षेत्रांतील अनेक नामवंत उद्योगपती, व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी “मैत्रीचा गणपती”ला भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले आहे.
या निमित्ताने विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यक्तींना एकाच ठिकाणी आणत त्यांच्या कार्याचा गौरव करण्याची परंपराही छाजेड परिवाराने जपली आहे.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजातील विविध घटकांना एकत्र आणणारा उत्सव व्हावा, या भावनेतून “मैत्रीचा गणपती”ची संकल्पना गेली १९ वर्षे पुढे नेली जात आहे.
जुन्या मित्रांच्या भेटीगाठी, नव्या संबंधांची सुरुवात आणि सामाजिक बांधिलकीची भावना यामुळे या उपक्रमाला दरवर्षी विशेष महत्त्व प्राप्त होत आहे.
“गणरायाच्या दर्शनाच्या निमित्ताने माणसं जोडणे आणि मैत्रीचे नाते अधिक घट्ट करणे, हाच मैत्रीच्या गणपतीचा खरा उद्देश आहे,” अशी भावना या उपक्रमामागे आहे.
१९ वर्षांची ही परंपरा आज पुण्यातील गणेशोत्सवातील एक आगळावेगळा मैत्री, सन्मान आणि सामाजिक एकोप्याचा सोहळा म्हणून ओळख निर्माण करत आहे.
