आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

विद्यापीठाच्या लेखा कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 30, 2026
Spread the love

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बी.कॉम. पदवीचे बनावट गुणपत्रक व पदवीचे बनावट प्रमाणपत्र तयार करून देण्यासाठी ७० हजार रुपये स्वीकारणाऱ्या विद्यापीठातील लेखा कर्मचाऱ्याविरुद्ध चतु:श्रृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

रमेश दामोदर मुखेकर (वय ४८, रा. सूरज अपार्टमेंट, शिंदेनगर, जुनी सांगवी) असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. राजेंद्र शंकर तलवारे (वय ५२, रा. सिंहगड रोड) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हा प्रकार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मार्च २०२६ ते १ जुलै २०२६ या कालावधीत घडला. पुणे विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागातील कर्मचारी रमेश मुखेकर याने साहिल कदम या विद्यार्थ्याला विद्यापीठाच्या बी.कॉम. अभ्यासक्रमाचे गुणपत्रक तसेच पदवी प्रमाणपत्र मिळवून देतो, असे सांगून ७० हजार रुपये गुगल पेद्वारे स्वीकारले होते.

तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर संगणकाद्वारे तयार केलेल्या मूळ कागदपत्रांसारख्या भासणाऱ्या प्रती पाठवून फसवणूक केली होती. रिक्षाचालकाने तक्रार केल्यानंतर गेल्या आठवड्यात विद्यापीठाने सत्यशोधन समिती स्थापन केली होती.

समितीने दिलेल्या अहवालानुसार रमेश मुखेकर हा विद्यापीठाच्या परीक्षा विभागात कार्यरत नाही. तसेच त्याने व्हॉट्सअ‍ॅपवर तयार करून दिलेली कागदपत्रे परीक्षा विभागाच्या अभिलेखांशी सुसंगत नसल्याचे दिसून आले.

मुखेकर याने पैसे स्वीकारून या गैरकृत्यात सहभाग घेतल्याचेही निष्पन्न झाले. त्यामुळे विद्यापीठाने त्याला निलंबित केले. या प्रकरणात सखोल तपासाच्या दृष्टीने विद्यापीठाच्या वतीने डॉ. राजेंद्र तलवारे यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रमेश मुखेकर याने हा गैरप्रकार परीक्षा विभागाशी संबंधित नसतानाही परीक्षा विभागाच्या व्यवस्थेबाबतचे त्याचे ज्ञान वापरून केल्याचे दिसून आले आहे.

रमेश मुखेकर याने केवळ एकालाच बी.कॉम. पदवीचे बनावट गुणपत्रक व पदवी प्रमाणपत्र तयार करून दिले की आणखी कोणाला अशी बनावट प्रमाणपत्रे तयार करून दिली, तसेच त्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे करीत आहेत.