सूर्यदत्त लॉ कॉलेजमध्ये ‘टॅक्स मूट सिम्युलेशन एक्स्पिरियन्स’चे आयोजन
सी.ए. शरद शाह यांचे कर कायद्यातील करिअरच्या संधी आणि व्यावहारिक कौशल्यांवर मार्गदर्शन
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या सूर्यदत्त लॉ कॉलेज (SLC) आणि ट्रान्सएज अॅडव्हायझरी एलएलपी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘टॅक्स मूट सिम्युलेशन एक्स्पिरियन्स’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आणि सीए इंटर्न्सना कर न्यायालयीन प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव, कायदेशीर संशोधन, प्रभावी युक्तिवाद आणि व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण मिळाले.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या सूर्यदत्त लॉ कॉलेज (SLC) आणि TransEdge Advisory LLP यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या मूट कोर्ट हॉलमध्ये ‘टॅक्स मूट सिम्युलेशन एक्स्पिरियन्स’ या विषयावरील विशेष तज्ज्ञ मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. कर न्यायालयीन प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव देणाऱ्या या अभिनव उपक्रमातून विद्यार्थ्यांना व सीए इंटर्न्सना कर कायद्याचे व्यावहारिक ज्ञान, न्यायालयीन मांडणीची पद्धत, कायदेशीर संशोधनाची दिशा तसेच प्रभावी वकिलीसाठी आवश्यक व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले.
वर्गातील सैद्धांतिक शिक्षणाला न्यायालयीन प्रक्रियेची प्रत्यक्ष जोड देऊन विद्यार्थ्यांना कायद्याच्या व्यवहारिक अंगाचा सखोल अनुभव मिळावा, हा या मूट कोर्ट उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. न्यायालयातील कामकाज, युक्तिवादाची पद्धत, पुराव्यांचे सादरीकरण, कायदेशीर संशोधन, न्यायनिवाड्यांचा संदर्भ आणि न्यायालयीन शिष्टाचार यांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
मूट कोर्टमध्ये विद्यार्थ्यांनी न्यायालयीन वातावरणाची वास्तवदर्शी पुनर्निर्मिती करत न्यायमूर्ती, याचिकाकर्ता, प्रतिवादी, सरकारी वकील, बचाव पक्षाचे वकील आदी विविध भूमिका प्रभावीपणे साकारल्या. संबंधित कायदे, न्यायालयीन निर्णय आणि विविध कायदेशीर तरतुदींचा सखोल अभ्यास करून विद्यार्थ्यांनी तर्कशुद्ध व अभ्यासपूर्ण युक्तिवाद सादर केले. त्यामुळे त्यांच्या संशोधन क्षमता, विश्लेषणात्मक विचारशक्ती, सार्वजनिक वक्तृत्व, कायदेशीर लेखन आणि आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले.
या सिम्युलेशनमध्ये विद्यार्थ्यांनी ‘Treaty Grandfathering Benefits for Bonus Shares’ तसेच ‘Presumptive Tax Conundrum and its Impact on Unexplained Investments’ या समकालीन आणि महत्त्वपूर्ण कर कायद्याशी संबंधित विषयांवर याचिकाकर्ता व प्रतिवादी या दोन्ही बाजूंनी प्रभावी युक्तिवाद मांडले. न्यायमूर्तींच्या प्रश्नांना त्यांनी आत्मविश्वासाने उत्तरे देत कायदेशीर संशोधनाची उत्कृष्ट झलक सादर केली.कार्यक्रमाचे उद्घाटन ‘Sharad Shah & Co.’ चे संस्थापक भागीदार सीए शरद शाह आणि TransEdge Advisory LLP चे संस्थापक पराग किरी यांच्या हस्ते झाले. त्यांनी बदलते कर कायदे, कर सल्लागार आणि कर वकील म्हणून उपलब्ध असलेल्या करिअरच्या संधी तसेच प्रभावी वकिली कौशल्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना सविस्तरपणे समजावून सांगितले. मूट कोर्ट स्पर्धेचे परीक्षण पियुष बाफना, चिराग चोरडिया, वासुदेवन जी. आणि धीरज दांडगावळ यांनी केले. विद्यार्थ्यांच्या अभ्यासपूर्ण तयारीचे, विषयावरील प्रभुत्वाचे आणि न्यायालयीन मांडणीतील आत्मविश्वासाचे त्यांनी कौतुक केले.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या सहउपाध्यक्षा स्नेहल नवलाखा यांनी उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, चार्टर्ड अकाउंटंट्स आणि कायदेतज्ज्ञांसोबतच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन अधिक व्यापक होत असल्याचे सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक तायवाडे यांनी कायद्याचे शिक्षण केवळ सैद्धांतिक नसून प्रत्यक्ष अनुभवावर आधारित असणे आवश्यक असल्याचे सांगितले. मूट कोर्टसारखे उपक्रम विद्यार्थ्यांना न्यायालयीन प्रक्रियेची प्रत्यक्ष ओळख करून देत सक्षम, आत्मविश्वासपूर्ण आणि नैतिक मूल्यांचे पालन करणारे विधिज्ञ घडविण्यास हातभार लावतात, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी केतकी बापट, डॉ. मोनिका सेहरावत, विजयदीप मुंजणकर आणि धनश्री पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. समारोपानंतर विद्यार्थ्यांनी मुक्त संवाद साधत या अनुभवामुळे न्यायालयीन प्रक्रियेबाबतची समज अधिक दृढ झाल्याची भावना व्यक्त केली.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० अनुभवाधारित शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योग-संस्थांमधील सहकार्यावर भर देते. न्यायालयीन प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना सक्षम, नैतिक आणि समाजाभिमुख कायदेतज्ज्ञ बनविण्यास महत्त्वपूर्ण ठरतो. – प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन
