४ पिस्तुले बाळगणाऱ्या गुन्हेगारास अटक
प्रयागराज येथून विक्रीसाठी आणले : खंडणी विरोधी पथकाची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून देशी बनावटीची पिस्तुले आणून त्यांची पुण्यात विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या गुन्हेगाराला खंडणी विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून २ लाख रुपये किमतीची चार देशी बनावटीची पिस्तुले आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
भूषण उत्तम मोहिते (वय २३, रा. ओम साई ऑर्चिड, पोकळे वस्ती, धायरी) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याचा साथीदार महेश कांबळे (रा. गुजरवाडी, कात्रज) याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस हवालदार दयानंद तेलंगे यांनी नर्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खंडणी विरोधी पथक २८ जुलै रोजी मध्यरात्री अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार सचिन माळवे, सोमनाथ कांबळे आणि दयानंद तेलंगे यांना माहिती मिळाली की, एक व्यक्ती देशी बनावटीची पिस्तुले विकण्यासाठी गोकुळनगर परिसरात येणार असून त्याच्याकडे तीन ते चार पिस्तुले आहेत.
ही माहिती पोलीस निरीक्षक महेश सागडे यांना देण्यात आली. त्यांनी आवश्यक कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस पथक गोकुळनगर येथे गेले असता तेथे एक व्यक्ती उभी असल्याचे दिसून आले. पोलिसांनी भूषण मोहिते याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडून चार देशी बनावटीची पिस्तुले आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
भूषण मोहिते याच्याविरुद्ध यापूर्वी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याच्याकडे पिस्तुलांबाबत चौकशी केली असता, तो व त्याचा मित्र महेश कांबळे हे दोघे प्रयागराज येथे गेले होते. प्रयागराज–मिर्झापूर मार्गावरील एका गावातून त्यांनी विक्रीसाठी ही चार पिस्तुले आणल्याची कबुली दिली. त्यानंतर नर्हे पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण पुढील तपास करीत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक महेश सागडे यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जर्हाड तसेच पोलीस अंमलदार रणजित फडतरे, रहिम शेख, सोमनाथ कांबळे, बाबासाहेब दांगडे, दयानंद तेलंगे, सचिन माळवे, प्रमोद पवार, किरण मोरे आणि सुहास जगताप यांनी केली.
