आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा श्री पूना गुजराती बंधू समाजात भव्य सत्कार

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 30, 2026
Spread the love

पुणे : गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा श्री पूना गुजराती बंधू समाजाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने गौरव करण्यात आला. राधा-कृष्णाची मूर्ती, शाल आणि पुष्पहार अर्पण करून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री पटेल यांनी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याचे कौतुक करत, समाजाची एकजूट आणि सेवाभावी वृत्ती हीच संस्थेच्या शताब्दी वाटचालीमागील खरी ताकद असल्याचे गौरवोद्गार काढले.

मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या हस्ते झालेल्या या सन्मान सोहळ्यास श्री पूना गुजराती बंधू समाजाचे अध्यक्ष जयंत शहा, कार्यकारी संचालक डॉ. राजेश शहा, उपाध्यक्ष वल्लभभाई पटेल, सहकार्यकारी संचालक नैनेश नंदू, सचिव राजेंद्र शहा, खजिनदार हरेश शहा, सुजय शहा यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि पुण्यातील मोठ्या संख्येने गुजराती समाजबांधव उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री पटेल यांनी समाजाच्या विविध उपक्रमांचे विशेष कौतुक करत, शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात श्री पूना गुजराती बंधू समाजाने केलेले योगदान उल्लेखनीय असल्याचे सांगितले.

समाजातील एकोपा, सेवाभाव आणि सातत्यपूर्ण कार्यामुळेच संस्थेने शंभर वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण केल्याचे त्यांनी नमूद केले.
सन्मानानंतर मुख्यमंत्री पटेल यांनी उपस्थित युवा खेळाडूंशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी गुजरात भवन आणि जयराज स्पोर्ट्स कन्व्हेन्शन सेंटरची पाहणी केली. खेळाडूंना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘खेलो इंडिया’ संकल्पनेला पुढे नेण्यासाठी अशा आधुनिक क्रीडा केंद्रांची महत्त्वाची भूमिका आहे.

ग्रामीण आणि शहरी भागातील गुणवान खेळाडूंना जागतिक दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ही केंद्रे मैलाचा दगड ठरणार आहेत.”
मुख्यमंत्री पटेल यांनी खेळाडूंना कठोर परिश्रम, शिस्त आणि समर्पणाच्या बळावर देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करण्याचे आवाहन केले तसेच त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

गुजरात भवन आणि जयराज स्पोर्ट्स कन्व्हेन्शन सेंटरमधील विविध सुविधा व उपक्रमांची पाहणी करून त्यांनी संस्थेच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.