आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मजुराकडून पिस्टल, १ जिवंत काडतुस जप्त

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 31, 2026
Spread the love

पुणे : मजूर म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाला पकडून भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याच्याकडून एक पिस्टल व एक जिवंत काडतूस जप्त केले आहे.

विशाल प्रल्हाद कलवले (वय २६, रा. ज्ञानेश्वरी हाइट्स, भिलारेवाडी) असे या मजुराचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे तपास पथक २९ जुलै रोजी पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी व सोहम शेंडकर यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, भिलारेवाडी येथील महानंद डेअरीजवळ एक व्यक्ती थांबला असून त्याच्याकडे अग्निशस्त्र आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तेथे जाऊन शोध घेतला असता विशाल कलवले हा मिळून आला. त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल व १ हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

त्याच्यासोबत राहणाऱ्या एका बिहारी मजुराचे हे पिस्टल असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. त्याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आर्म्स ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पुढील तपास करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सोहम शेंडकर, सचिन सरपाले, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार आणि संदीप आगळे यांनी केली.