आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

चांगला परतावा देण्याच्या आमिषाने ४३ जणांची फसवणूक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 31, 2026
Spread the love

पुणे : शेअर मार्केट व शासकीय संस्थांमध्ये आम्ही गुंतवणूक करतो, तसेच तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगून एका पती-पत्नीने ४३ जणांची ९० लाख ९७ हजार ६७५ रुपयांची फसवणूक करून फरार झाले आहेत.

पांडुरंग किसन खामकर आणि माधुरी पांडुरंग खामकर (दोघे रा. एफ रेसिडेन्सी सोसायटी, वडगाव शेरी) अशी आरोपींची नावे आहेत.

याबाबत भागवत बाबासाहेब बलांडे (वय २९, रा. गणेशनगर, वडगाव शेरी) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०२१ ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे भाजी विक्रीचे दुकान आहे. २०२१ मध्ये पांडुरंग व माधुरी खामकर हे त्यांच्या दुकानात आले.

आम्ही गुंतवणूक सल्लागार असून शेअर मार्केटमधील गुंतवणूक व फायनान्शियल लिटरसीबाबत माहिती देत असल्याचे त्यांनी सांगितले.

ते नियमित दुकानावर येत असल्याने त्यांची चांगली ओळख झाली. त्यांनी फिर्यादींना त्यांच्या कार्यालयात बोलावून अधिक माहिती दिली.

त्यानंतर फिर्यादींनी त्यांच्याकडील ८० हजार रुपये टेडेझ फायनान्शियल सर्व्हिसेस (Tedez Financial Services) या कंपनीत गुंतवले.

त्यानंतर आरोपींनी फिर्यादींना विविध बँकांकडून कर्ज काढण्यास प्रवृत्त करून ते पैसे कंपनीत गुंतवण्यास भाग पाडले. २०२४ पर्यंत फिर्यादींनी एकूण १६ लाख रुपये गुंतवले.

त्यावर आरोपींनी परतावा म्हणून ६ लाख रुपये दिले. त्यानंतर माधुरी खामकर हिने, “तुमच्यासोबत इतरांनाही गुंतवणूक करण्यास सांगा. आमच्याकडे सरकारमान्य ब्रोकिंग हाऊस आहे,” असे सांगितले. त्यानुसार इतर अनेकांनीही त्यांच्याकडे गुंतवणूक केली.

मात्र, त्यानंतर गुंतवणूकदारांना परतावा मिळणे बंद झाले. त्यांनी पैसे परत मागितल्यावर आरोपींनी टाळाटाळ केली आणि “दोन-तीन महिने थांबा,” असे सांगितले.

३ एप्रिल २०२६ रोजी पैशांची मागणी केल्यावर माधुरी खामकर हिने, “माझे पती आल्यानंतर तुमच्या पैशांबाबत बोलू. मी आता कोणाच्याही संपर्कात राहणार नाही,” असे सांगितले. त्यानंतर दोघांचेही मोबाईल फोन बंद लागले.

या पती-पत्नीने एकूण ४३ जणांची ९० लाख ९७ हजार ६७५ रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले असून, पोलीस उपनिरीक्षक भरसट पुढील तपास करीत आहेत.