आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

रेकॉर्डवरील टोळीकडून पिस्टल, जिवंत काडतूस जप्त

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 1, 2026
Spread the love

पुणे : रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या टवाळखोरांना अटकाव करण्यासाठी गस्त घालणाऱ्या येरवडा पोलीस ठाण्यातील तपास पथकाने रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या टोळीला पकडून त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतूस जप्त केले आहे.

महेश अशोक कांबळे (वय २१, रा. प्रज्ञा अपार्टमेंट, हिरा गार्डन, भुगाव), गणेश तुळशीराम पवार (वय २२, रा. समर्थ रेसिडेन्सी, लगड कॉलनी, नांदेड सिटी) आणि यश चंद्रकांत उरणकर (वय २२, रा. पॉप्युलर टॉवर, संभाजी चौक, पाषाण) अशी या तिघांची नावे आहेत.

येरवडा पोलीस ठाण्याचे तपास पथक २८ जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजता पेट्रोलिंग करत होते. रात्री उशिरापर्यंत फिरणाऱ्या टवाळखोरांना रोखण्यासाठी ते गस्त घालत होते.

त्यावेळी पोलीस अंमलदार बालाजी सोगे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, तिघेजण चव्हाण चौकातून मुळीक फार्मकडील रस्त्यावर मोकळ्या जागेत थांबले असून त्यांच्याकडे अग्निशस्त्र आहे.

या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी तेथे जाऊन पाहणी केली असता तिघेजण थांबलेले दिसून आले. पोलिसांना पाहून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.

मात्र, पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. त्यांच्याकडून १ देशी बनावटीचे पिस्टल व १ जिवंत काडतूस मिळून आले. पिस्टल विक्री करण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनिकांत, सहायक पोलीस आयुक्त सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गिते, पोलीस निरीक्षक केशव दिंडे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड, पोलीस अंमलदार मुकुंद कोकणे, शैलेश वाबळे, बालाजी सोगे, संदीप जायभाये, नटराज सुतार, गणेश पालवे, साईनाथ म्हस्के, अनिल मन्हाळकर आणि सोमनाथ गायकवाड यांनी केली.