आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अवैध धंदेवाल्यांशी संबंध ठेवणारा पोलीस अंमलदार बडतर्फ

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 1, 2026
Spread the love

पुणे : स्वारगेट पोलीस ठाण्यात नेमणूक असताना सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून हप्ता वसुली करणे, तसेच अंमली पदार्थ विक्रेत्यांना मदत करणाऱ्या पोलीस अंमलदाराला अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी पोलीस सेवेतून बडतर्फ केले आहे.

नवनाथ कांताराम शिंदे असे या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. शिंदे हे स्वारगेट पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते. सध्या ते पोलीस मुख्यालयात नेमणुकीस होते.

सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करण्यात आली असता, एका अवैध धंदेवाल्याने याबाबत माहिती दिली होती. नवनाथ शिंदे हे स्वारगेट पोलीस ठाण्यात नेमणुकीस असताना गांजा विक्रेत्यांशी संबंध व संपर्क ठेवत होते.

सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांना प्रोत्साहन देणे, तसेच त्यातून स्वतःसाठी आर्थिक लाभ मिळविणे, असे गैरवर्तन केल्याने त्यांना निलंबित करून चौकशी सुरू करण्यात आली होती.

विभागीय चौकशीत नवनाथ शिंदे यांचे अवैध धंदे करणाऱ्यांशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्यांच्याकडून ते नियमित हप्ता घेत असल्याचे साक्षीदारांनी जबाबात नमूद केले.

शिंदे यांच्या मोबाईलमध्ये अवैध धंदे चालविणाऱ्यांचे मोबाईल क्रमांक जतन केल्याचेही दिसून आले. पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी २१ ऑगस्ट २०२५ रोजी शिंदे यांना निलंबित केले होते.

सहायक पोलीस आयुक्तांनी २३ सप्टेंबर २०२५ रोजी सादर केलेल्या चौकशी अहवालात शिंदे हे गांजाचा अवैध धंदा करणाऱ्या आरोपीच्या संपर्कात राहून त्याच्याकडून दरमहा पैसे घेत अवैध धंद्यांवरून वसुली करीत असल्याचे दिसून आले होते.

विभागीय चौकशीच्या अहवालात दोषी ठरविण्यात आल्याने पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी नवनाथ शिंदे यांना पोलीस सेवेतून काढून टाकण्याची शिफारस केली.

या सर्व चौकशीचे अवलोकन केल्यानंतर अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी पोलीस अंमलदार नवनाथ शिंदे यांना पोलीस सेवेतून काढून (बडतर्फ) टाकले आहे.