सुलाखे हायस्कूलचे क्रीडा शिक्षक समीर वायकुळे यांची बार्शी तालुका क्रीडा संयोजकपदी नियुक्ती
२०२६-२७ शैक्षणिक वर्षासाठी निवड; शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : बार्शी तालुक्यातील सुलाखे हायस्कूलचे क्रीडा शिक्षक समीर वायकुळे यांची २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी बार्शी तालुका क्रीडा सहसंयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर यांनी याबाबत नियुक्तीचे अधिकृत पत्र जारी केले आहे.
या नियुक्तीनंतर तालुक्यातील शालेय क्रीडा स्पर्धांचे प्रभावी नियोजन, आयोजन, समन्वय तसेच विविध क्रीडा उपक्रमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी समीर वायकुळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
समीर वायकुळे यांनी क्रीडा शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयी आवड निर्माण करण्याबरोबरच अनेक खेळाडूंना जिल्हा व राज्यस्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने कार्य केले आहे.
त्यांच्या अनुभव, कार्यतत्परता आणि क्रीडाप्रेमाची दखल घेत त्यांची तालुका क्रीडा संयोजकपदी निवड करण्यात आल्याने सुलाखे हायस्कूलसह संपूर्ण बार्शी तालुक्याचा गौरव वाढला आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल सुलाखे हायस्कूलचे प्राचार्य, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यांच्या नेतृत्वाखाली बार्शी तालुक्यातील शालेय क्रीडा चळवळीला अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
