मॅनेजरवर खुनी हल्ला करणाऱ्या तिघांना अटक
काँक्रीट टाकण्याचे काम सुरू असल्याने रस्ता होता बंद : फुरसुंगी पोलिसांची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : तुकाई दर्शन येथे रस्त्यावर काँक्रीट टाकण्याचे काम सुरू असल्याने रस्ता बंद करण्यात आला होता. याच कारणावरून “आम्ही इथले भाई आहोत,” असे म्हणत गुंडांनी मॅनेजरवर हल्ला करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. फुरसुंगी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
प्रकाश राजेंद्र जाधव (वय ३३, रा. माऊली कॉलनी, काळेपडळ), निलेश उद्धव गुरव (वय ३५, रा. यशराज ग्रीन सोसायटीसमोर, माऊली कॉलनी क्रमांक २, काळेपडळ) आणि विशाल तानाजी शेगर (वय २१, रा. काळेपडळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विशाल शेगर याच्याविरुद्ध इंदापूर येथे खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे.
याबाबत आदित्य कुमार संजय कुमार सिंग (वय २४, रा. वडकीनाला) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन इन्फ्रा इंजिनिअरिंग कंपनीच्या वतीने सासवड रोडवरील तुकाई दर्शन येथे ३१ जुलै रोजी मध्यरात्री काँक्रीटचा रस्ता तयार करण्याचे काम सुरू होते.
त्यामुळे तो रस्ता बंद करण्यात आला होता. मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास हे तिघे दोन मोटारसायकलींवरून तेथे आले. रस्ता बंद केल्याच्या कारणावरून त्यांनी फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर वाद घातला. त्यांनी फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांना शिवीगाळ केली. “आम्ही इथले भाई आहोत.
रस्ता खोदून आमची अडवणूक करतोस काय? याला आता जिवंत सोडायचे नाही,” असे म्हणत त्यांनी फिर्यादीवर जीवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी वस्तूने हल्ला करून गंभीर जखमी केले. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोष मोरे पुढील तपास करीत आहेत.
