आयुर्विमा पॉलिसीचे पैसे देण्याच्या आमिषाने २८ लाखांना गंडा
सायबर चोरट्यांनी केली ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक : भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : आयुर्विमा पॉलिसीचे पैसे मिळवून देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची २८ लाख ३८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.
याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिक आंबेगाव परिसरात राहतात. त्यांनी आयुर्विमा पॉलिसी काढली होती. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधून आयुर्विमा पॉलिसीचे पैसे परत मिळवून देण्याची बतावणी केली.
त्यानंतर चोरट्यांनी त्यांना पॉलिसीची रक्कम परत मिळवण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल, असे सांगितले. विविध प्रकारचे कर भरल्यानंतर पॉलिसीची संपूर्ण रक्कम व्याजासह मिळेल, असेही त्यांना सांगण्यात आले. वेगवेगळी कारणे सांगून चोरट्यांनी त्यांना पैसे भरण्यास सांगितले. चोरट्यांच्या खात्यात त्यांनी वेळोवेळी २८ लाख ३८ हजार रुपये जमा केले.
मात्र, पॉलिसीची रक्कम परत न मिळाल्याने त्यांनी चोरट्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. त्यावेळी चोरट्यांचा मोबाइल बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने नुकतीच पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक कैलास कोडग पुढील तपास करत आहेत.
व्यावसायिकाची १० लाखांची फसवणूक
सायबर चोरट्यांनी एका व्यावसायिकाची १० लाख ३८ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका व्यावसायिकाने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार व्यावसायिक सिंहगड रस्ता परिसरात राहतात. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधून स्वस्त दरात लिथियम बॅटरी देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. त्यांच्या सांगण्यावरून व्यावसायिकाने वेळोवेळी चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस पुढील तपास करत आहेत.
