आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अर्हम् फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. शैलेश पगारिया यांना ‘कौशल्य पुरस्कार’ प्रदान

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 3, 2026
Spread the love

पुणे : शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत अर्हम फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. शैलेश पगारिया यांना प्रतिष्ठेचा ‘कौशल्य पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. नाशिक येथे आयोजित भव्य समारंभात त्यांचा हा सन्मान करण्यात आला.

जैन श्वेतांबर स्थानकवासी श्रीसंघ, नाशिक आयोजित तसेच प. पू. श्री प्रीतिसुधाजी शिक्षण फंड, नाशिक संचलित ‘शिष्यवृत्ती, शैक्षणिक एवं कौशल्य पुरस्कार प्रदान समारंभ’ रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी नाशिक येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

यावेळी डॉ. शैलेश पगारिया यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘कौशल्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मातोश्री कौशल्याबाई मोहनलालजी बलदोटा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात आला.

डॉ. कन्हैयालाल तसेच सचिन-समीर बलदोटा परिवार, नाशिक यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघशिरोमणी संघपती मंगलचंद साखला होते.

यावेळी उपाध्यक्ष मोहनलाल ब्रह्मेचा व शंकरलाल गांग, सचिव जवरीलाल भंडारी, खजिनदार ललित मोदी यांच्यासह संघाचे विश्वस्त, पदाधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

प. पू. श्री प्रीतिसुधाजी शिक्षण फंडाचे खजिनदार विजय बेदमुथा यांच्या विशेष सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच चातुर्मास समिती २०२६ चे अध्यक्ष निरज बोथरा व स्वागताध्यक्ष सुरज मुनोत यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

प. पू. श्री प्रीतिसुधाजी शिक्षण फंड गेली ४८ वर्षे जैन ओसवाल समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कार्यरत आहे.

दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याबरोबरच शिक्षण, समाजसेवा आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा ‘कौशल्य पुरस्कार’ देऊन गौरव केला जातो.

आयंबिल तपाराधिका, स्वर्णसंघ आराधिका महासतीजी प. पू. डॉ. पुनीतज्योतिजी म. सा. यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

अर्हम् फाऊंडेशनच्या माध्यमातून शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या चारित्र्य व व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या डॉ. शैलेश पगारिया यांच्या या सन्मानामुळे पुण्यातील जैन समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी श्रीकांत पगारिया, राजश्री पगारिया, प्रीती पगारिया, स्वराज पगारिया, रुषांग पगारिया, पंकज साखला यांच्यासह पुण्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.