लायन्स डिस्ट्रिक्ट ३२३४ डी१ चा ‘नेतृत्व रंजन’ डिस्ट्रिक्ट कॅबिनेट इन्स्टॉलेशन सोहळा उत्साहात संपन्न
आंतरराष्ट्रीय संचालक लायन सुरज बागला यांच्या हस्ते ३१८ कॅबिनेट अधिकाऱ्यांचा शपथविधी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
सोलापूर : लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी१ (लायन वर्ष २०२६-२७) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘नेतृत्व रंजन’ डिस्ट्रिक्ट कॅबिनेट इन्स्टॉलेशन हा भव्य पदग्रहण सोहळा रविवारी (दि. २ ऑगस्ट) रेजेंटा सेंट्रल शिवानी, चिंचोली एमआयडीसी, सोलापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी आंतरराष्ट्रीय संचालक लायन सुरज बागला (पीएमजेएफ) यांच्या हस्ते डिस्ट्रिक्टमधील ३१८ कॅबिनेट अधिकाऱ्यांना पदांची शपथ देण्यात आली. डिस्ट्रिक्टच्या इतिहासातील हा सर्वात मोठ्या कॅबिनेट इन्स्टॉलेशन सोहळ्यांपैकी एक ठरला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आंतरराष्ट्रीय संचालक लायन सुरज बागला (पीएमजेएफ) यांचे सुंदर सजवलेल्या रथातून ढोल-ताशांच्या गजरात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले.
रथामध्ये आंतरराष्ट्रीय संचालक लायन सुरज बागला यांच्यासमवेत डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजेंद्र शाह-कांसवा विराजमान होते. तर रथाच्या पुढे प्रथम उपप्रांतपाल, द्वितीय उपप्रांतपाल, माजी प्रांतपाल, डिस्ट्रिक्ट कॅबिनेट अधिकारी तसेच शेकडो लायन्स व लिओ सदस्य उत्साहात सहभागी झाले होते.
या दिमाखदार स्वागत मिरवणुकीने संपूर्ण परिसर सेवाभाव, शिस्त आणि उत्साहाने भारावून गेला. कार्यक्रमाची सुरुवात लिओ आराध्या नळे यांनी सादर केलेल्या श्री गणेश वंदनेने झाली.
त्यानंतर डिस्ट्रिक्ट कॅबिनेट सचिव लायन रमेश जैन यांनी लायन्स फ्लॅग सॅल्युटेशन व राष्ट्रगीत सादर केले. कार्यक्रमाची प्रस्तावना व स्वागतपर भाषण इन्स्टॉलेशन कन्व्हेनर लायन अशोक मेहता (पीएमजेएफ) यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर लायन्स आंतरराष्ट्रीय संचालक ला. सुरज बागला (पीएमजेएफ), ला. रश्मी सुरज बागला, प्रमुख वक्ते डॉ. विठ्ठल लहाने, लायन्स डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ला. राजेंद्र शाह-कांसवा (पीएमजेएफ), फर्स्ट लेडी ऑफ डिस्ट्रिक्ट ला. रंजना राजेंद्र शाह-कांसवा (एमजेएफ), प्रथम उपप्रांतपाल ला. डॉ. किरण खोराटे (एमजेएफ), द्वितीय उपप्रांतपाल ला. मंगेश दोशी (पीएमजेएफ),
मल्टिपल डिस्ट्रिक्ट ३२३४ चे कौन्सिल सेक्रेटरी/ट्रेझरर ला. डॉ. विरेंद्र चिखले (पीएमजेएफ), डिस्ट्रिक्ट कॅबिनेट सचिव ला. रमेश जैन, डिस्ट्रिक्ट कॅबिनेट कोषाध्यक्ष ला. सुरेश जाजू (एमजेएफ), डिस्ट्रिक्ट मुख्यालय प्रभारी ला. दिनेश बिराजदार, लिओ डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट लिओ सौरभ मालू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख वक्ते म्हणून लातूरचे सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने यांनी उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी इंग्रजीतील “RECORD” या सहा अक्षरांच्या माध्यमातून जबाबदारी, पात्रता, योग्य सल्ला, सूक्ष्म निरीक्षण, नातेसंबंध जपणे आणि शिस्त या जीवनातील सहा महत्त्वपूर्ण मूल्यांचे महत्त्व प्रभावी उदाहरणांसह उलगडून सांगितले.
कुटुंब, समाज आणि सेवाकार्यात या गुणांचा अंगीकार केल्यास प्रत्येक व्यक्ती यशस्वी होऊ शकते, असा संदेश त्यांनी दिला. त्यांच्या ओघवत्या आणि प्रेरणादायी मार्गदर्शनाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन शाह-कांसवा यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात नव्या कॅबिनेटवर पूर्ण विश्वास व्यक्त केला. “आजपर्यंत इतकी सक्षम, उत्साही आणि समर्पित टीम कधीच कोणा प्रांतपालांना लाभली नव्हती.
या वर्षाची सुरुवात अत्यंत सकारात्मक झाली असून, आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या बळावर डिस्ट्रिक्ट ३२३४ डी१ चे नाव मल्टिपल तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही निश्चितपणे गाजेल, याची मला शंभर टक्के खात्री आहे,” असे ते म्हणाले.
“मी एकटाच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आहे, असा विचार न करता प्रत्येक कॅबिनेट अधिकारी आणि प्रत्येक सदस्याने स्वतःला डिस्ट्रिक्ट गव्हर्नर समजून जबाबदारीने काम करावे.
आपण सर्वांनी एक टीम म्हणून काम केले, तर सेवाकार्यात नवे विक्रम प्रस्थापित करू,” असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. आंतरराष्ट्रीय संचालक लायन सुरज बागला यांनी आपल्या मार्गदर्शनात लायन्स इंटरनॅशनलची ओळख समाजात अधिक दृढ करण्यासाठी कायमस्वरूपी समाजोपयोगी सेवा प्रकल्प उभारण्याचे आवाहन केले.
बसस्टॉप, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, आरोग्य प्रकल्प तसेच इतर सार्वजनिक उपक्रमांवर लायन्सचे नाव आणि चिन्ह दिसले पाहिजे, जेणेकरून समाजाला संस्थेच्या सेवाकार्याची जाणीव होईल.
सेवा ही केवळ कार्यक्रमापुरती मर्यादित न राहता ती समाजाच्या दैनंदिन जीवनातही दिसली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी एलसीआयएफ लेगसी प्रोग्राम विषयी विशेष मार्गदर्शन केले.
सदस्यांनी आपल्या मृत्यूनंतर आपल्या संपत्तीतील काही हिस्सा लायन्स क्लब्स इंटरनॅशनल फाउंडेशन (एलसीआयएफ) ला देण्याचा संकल्प करणारा लेगसी फॉर्म भरावा, असे आवाहन त्यांनी केले.
या उपक्रमासाठी त्यांनी ५० लेगसी फॉर्म डिस्ट्रिक्ट एलसीआयएफ लेगसी प्रोग्राम चेअरमन लायन संतोष काबरा यांच्याकडे सुपूर्द केले.
कार्यक्रमातच लायन अभय सुराणा, लायन श्रीनिवास कटकुर, लायन संतोष काबरा आणि लायन कल्पेश मालू यांनी या उपक्रमात सहभागी होण्याची तयारी दर्शविली.
कार्यक्रमादरम्यान मनीषा जैन, पूनम जैन, सोनल कटारिया आणि तेजल पोखरणा यांनी आपल्या वडिलांच्या सेवाभावी कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले.
त्यांच्या भावनिक शब्दांनी संपूर्ण सभागृह काही क्षण स्तब्ध झाले. आपल्या वडिलांच्या अथक परिश्रम, समर्पण आणि समाजसेवेबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त करत त्यांना मानाची सलामी दिली.
मुलींच्या भावना व्यक्त होत असताना त्यांच्या वडिलांचेही डोळे पाणावले आणि सभागृहातील वातावरण अत्यंत भावूक झाले. यानंतर आंतरराष्ट्रीय संचालक लायन सुरज बागला यांच्या हस्ते ३१८ डिस्ट्रिक्ट कॅबिनेट अधिकाऱ्यांचा शपथविधी पार पडला.
डिस्ट्रिक्ट ३२३४ डी१ अंतर्गत कार्यरत ७७ लायन्स क्लब, १ लिओ-लायन्स क्लब आणि १० लिओ क्लब, अशा एकूण ८८ क्लबांचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार व पदाधिकारी या ऐतिहासिक सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी व ओघवते सूत्रसंचालन लायन नरेंद्र गंभीरे आणि लायन सुरेखा गंभीरे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी डिस्ट्रिक्ट कॅबिनेट कोषाध्यक्ष लायन सुरेश जाजू यांनी उपस्थितांचे आभार मानले.
त्यानंतर ला. उमा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पसायदान सादर करण्यात आले आणि कार्यक्रमाची सांगता झाली. “सॅटिस्फॅक्शन बाय सर्व्हिस” हे डिस्ट्रिक्टचे ब्रीदवाक्य आणि “रूटेड इन सर्व्हिस” या लायन्स इंटरनॅशनलच्या जागतिक सेवाभावी संकल्पनेचा जागर करत समाजसेवा, नेतृत्व विकास आणि संघटनात्मक बळकटीचा नवा संकल्प या भव्य सोहळ्यातून व्यक्त करण्यात आला.
उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने, सेवाभावाने आणि समर्पणाच्या भावनेतून कार्य करत डिस्ट्रिक्ट ३२३४ डी१ ला मल्टिपल तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर नवे यश मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला.
