आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

दारुच्या नशेतील पोलीस व्हॅनच्या चालकाची ४ वाहनांना धडक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 3, 2026
Spread the love

पुणे : टिळक रोडवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दारूच्या नशेत पोलीस व्हॅन चालविणाऱ्या चालकाने देशमुखवाडी परिसरात पार्क केलेल्या चार वाहनांना धडक दिल्याची घटना समोर आली आहे. देशमुखवाडीतील अरुंद गल्लीत घुसलेल्या या पोलीस व्हॅनने दोन कार, एक पॅगो टेम्पो आणि एक दुचाकीला धडक देऊन मोठे नुकसान केले. सुदैवाने वाहनांमध्ये कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

बाळासाहेब वसंत खैरे (वय ५२) असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे. खैरे हे मोटार वाहन विभागात कार्यरत आहेत. हा अपघात टिळक रोडलगत असलेल्या देशमुखवाडी येथे शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडला.

विश्रामबाग पोलिसांनी या पोलीस हवालदाराविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. याबाबत अभिषेक गोविंद लिमये (वय ३८, रा. गुरुप्रसाद वाडा, देशमुखवाडी, सदाशिव पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस हवालदार बाळासाहेब खैरे हे पोलीस व्हॅन घेऊन टिळक रोडने जात होते. टिळक रोडवर वाहतूक कोंडी झाल्याने त्यांनी मोठी पोलीस व्हॅन देशमुखवाडीतील गल्लीत वळवली.

गल्लीत रस्त्याच्या कडेला कार आणि टेम्पो पार्क करण्यात आले होते. खैरे यांनी एका कारला मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे ती कार पुढील कारला आणि त्यानंतर टेम्पोला जाऊन धडकली.

त्यानंतर त्यांनी पुन्हा त्या कारला धडक देत पोलीस व्हॅन भरधाव वेगाने भिकारदास मारुती रोडच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक नागरिकांनी पोलीस व्हॅन अडवून चालक बाळासाहेब खैरे यांना पकडले.

त्यानंतर ११२ क्रमांकावर अपघाताची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

या अपघातात अभिषेक गोविंद लिमये यांची हुंडाई कार, कुंदन कुमार साठे यांची मारुती सुझुकी वॅगन आर, अद्वैत राजस खळदकर यांची ज्युपिटर दुचाकी आणि विश्वनाथ लक्ष्मण लिमये यांचा तीनचाकी पॅगो टेम्पो यांचे मोठे नुकसान झाले.

विश्रामबाग पोलिसांनी बाळासाहेब खैरे यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यामध्ये ते मद्याच्या अंमलाखाली असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.