आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

२ वाँटेड गुन्हेगार, २ अल्पवयीन मुले जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 4, 2026
Spread the love

पुणे : तरुणावर वार करून त्याचा निर्घृण खून करून फरार झालेल्या २ वाँटेड गुन्हेगार व २ अल्पवयीन मुलांना गुन्हे शाखेच्या युनिट २च्या पथकाने जेरबंद केले.

सुजित सोमनाथ धुतावळे (वय १९, रा. समर्थनगर, हिंगणे खुर्द) आणि आशिष राजू सोनवणे (वय १९, रा. समर्थनगर, हिंगणे खुर्द, सिंहगड रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

या दोघांना सिंहगड रोडवरील हिंगणे चौक येथून ताब्यात घेण्यात आले. दोन अल्पवयीन मुलांना पद्मावती येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या शुभम राजू घोडके (वय २२, रा. चरवड वस्ती, वडगाव) याच्यावर १ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता टोळक्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याचा खून केला होता.

या गुन्ह्यात पर्वती पोलिसांनी यापूर्वी ५ जणांना अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट २चे पथक आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार उज्ज्वल मोकाशी, शिवानंद कायगुडे, महेश मंडलिक व संदीप शिर्के यांना माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील आरोपी सिंहगड रोडवरील हिंगणे चौक परिसरात फिरत आहेत.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी हिंगणे चौकात जाऊन पाहणी केली. तेथे थांबलेल्या दोघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले. तसेच पद्मावती येथून २ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले.

पुढील कारवाईसाठी त्यांना पर्वती पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, पोलीस अंमलदार शिवानंद कायगुडे, उज्ज्वल मोकाशी, महेश मंडलिक, संदीप शिर्के, शंकर नेवसे, विनोद चव्हाण, नागनाथ राख, कुंदन शिंदे, आशिष यादव, संजय आबनावे, शंकर कुंभार, विजय पवार, साधना ताम्हाणे, योगेश मांढरे, विद्या शिंदे, सदाम तांबोळी व विनायक वगारे यांनी केली.