गुन्हेगाराकडून एक पिस्टल, जिवंत काडतूस जप्त
सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी : सनसिटी रोडवर सराईत गुन्हेगारावर कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सनसिटी रोडवर थांबलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पकडून सिंहगड रोड पोलिसांनी त्याच्याकडून एक पिस्टल व जिवंत काडतूस जप्त केले आहे.
यश ऊर्फ दादया कमलाकर घोलप (वय १८, रा. आझाद मित्र मंडळाजवळ, चरवडवस्ती, वडगाव तसेच गावडे बिल्डिंग, जाधवनगर, वडगाव) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.
सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील तपास पथक ३० जुलै रोजी गस्त घालत होते. पोलीस अंमलदार विनायक मोहिते व सागर शेडगे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार दादया घोलप याच्याकडे एक गावठी पिस्टल असून तो सनसिटी रोडवरील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर थांबलेला आहे.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता तेथे टी-शर्ट व ट्रॅकपॅन्ट घातलेला घोलप उभा असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तो काहीतरी गुन्हा करण्यासाठी थांबला असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्याची झडती घेतली.
त्यावेळी त्याच्याकडे ४० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्टल व १ हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस आढळून आले. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर पुढील तपास करीत आहेत.
ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. सागर कवडे, सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक समीर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार उत्तम तारू, आण्णा केकाण, सतीश मोरे, विकास बांदल, राहुल ओलेकर, सागर शेडगे, विनायक मोहिते, संदीप कांबळे, समीर माळवदकर, तानाजी सागर व शिरीष गावंडे यांनी केली.
