९ महिन्यांच्या बाळाच्या तोंडात ‘फेव्हि क्विक’ टाकले
लोहगावमधील कलवड वस्तीतील घटना : बाळावर आयसीयूमध्ये उपचार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : घरगुती भांडणातून भावजयीने ९ महिन्यांच्या पुतण्याच्या तोंडात ‘फेव्हि क्विक’ टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बाळाच्या तोंडाला जखमा झाल्या असून त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
याबाबत अल्ताफ नबी शेख (वय ३९, रा. कलवड वस्ती, लोहगाव) यांनी लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी सानिया शेख (रा. कलवड वस्ती, लोहगाव), रियाज इमाम हाल्याळ (वय ४८, रा. कांदिवली, मुंबई) आणि हाजी मलंग शेख (रा. कांदिवली, मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार लोहगावमधील कलवड वस्ती येथील त्यांच्या राहत्या घरात ३१ जुलै २०२६ रोजी सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्ताफ शेख व त्यांचा भाऊ एकत्र राहतात. त्यांच्यामध्ये घरगुती कारणावरून वादावादी झाली होती. या जुन्या भांडणाच्या कारणावरून सानिया शेख हिने अल्ताफ शेख यांच्या ९ महिन्यांच्या अली या मुलाच्या तोंडात ‘फेव्हि क्विक’ टाकले. त्यामुळे या बाळाच्या तोंडात जखमा झाल्या. त्याला उलटी झाल्याने हा प्रकार त्याची आई जैनाब शेख हिच्या लक्षात आला. बाळाचे ओठ चिकटल्यासारखे झाल्याने त्या घाबरल्या. त्यांनी तातडीने आपल्या पतीला फोन करून ही बाब कळविली. त्यांनी बाळाला ससून रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
अल्ताफ शेख यांची पत्नी जैनाब शेख हिने सानिया शेख हिला याबाबत विचारले असता, तिने “कोणाला सांगितले तर सोडणार नाही,” अशी धमकी दिली. तसेच तिचे नातेवाईक रियाज हाल्याळ आणि हाजी मलंग शेख हे रुग्णालयात आले. त्यांनी जैनाब शेख यांना, “मुलगा व्यवस्थित असून मुद्दाम आमच्या मुली सानिया शेख हिच्याविरुद्ध तक्रार दिली तर तुला दाखवितो,” अशी धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले तपास करीत आहेत.
जलद जोडण्यासाठी वापरले जाते ‘फेव्हि क्विक
तुटलेली वस्तू जोडायची असेल तर अगदी मामुली ५ रुपयांना मिळणारे ‘फेव्हि क्विक’ नेहमी वापरले जाते. त्या छोट्याशा ट्यूबचे वरचे टोक फिरवून तोडले की, जी वस्तू जोडायची आहे त्यावर ते टाकले जाते. काही क्षणांत हे केमिकल घट्ट होऊन ती वस्तू जोडली जाते. हे वापरताना थोडे जरी हाताला लागले तरी त्याचा डाग सहज जात नाही. या बाळाच्या तोंडात ते टाकल्यानंतर काय झाले असेल, त्या बाळाला किती त्रास झाला असेल, याचा विचारही करवत नाही. मात्र, ते विषारी नसल्यामुळे जीवाला धोका निर्माण होत नाही. ‘फेव्हि क्विक’ तोंडात पडताच ते लाळेच्या संपर्कात येऊन एका सेकंदात पांढऱ्या थरासारखे कडक होते. लाळेतील ओलसरपणामुळे ते तोंडातच लगेच घट्ट होऊन तिथेच चिकटून बसते. ते इतक्या वेगाने घट्ट होते की ते पोटात जात नाही. ‘फेव्हि क्विक’मध्ये सायनोअॅक्रिलेट (Cyanoacrylate) हे रसायन असते. त्यामध्ये इथिल सायनोअॅक्रिलेट, स्टॅबिलायझर्स आणि घट्टपणा वाढविण्यासाठी इतर रसायने मिसळलेली असतात. त्याचा हवेशी संपर्क होताच ते लगेच घट्ट होऊन वस्तू जोडण्याचे काम करते.
