सायबर चोरट्यांनी ज्येष्ठाची केली १९ लाखांची फसवणूक
डिजिटल अॅरेस्टची दाखवली भीती : डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बँक खात्यातून दहशतवादी कारवायांसाठी पैसे पाठविण्यात आल्याची बतावणी करून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची १९ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केली.
याबाबत एका ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्येष्ठ नागरिक चिंचवड परिसरात राहतात.
ते निवृत्त शासकीय कर्मचारी असून, त्यांचे बँक खाते डेक्कन जिमखाना भागातील एका बँकेत आहे. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर २९ जुलै रोजी संपर्क साधून पोलीस असल्याची बतावणी केली.
“तुमच्या बँक खात्याचा वापर दहशतवादी कारवायांसाठी झाला आहे. या प्रकरणात तुमचे वय लक्षात घेऊन तुम्हाला डिजिटल अॅरेस्ट केले जाणार आहे. अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे भरावे लागतील,” अशी बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली.
त्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने शहानिशा न करता चोरट्यांच्या खात्यात १९ लाख ४५ हजार रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक सपना देवताळे तपास करीत आहेत.
स्वस्तात सहलीचे आमिष दाखवून फसवणूक – पुणे : स्वस्तात सहलीचे आमिष दाखवून एका पर्यटन कंपनीच्या संचालकांनी ९ लाख ३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी निमा हॉलिडेज प्रा. लि. या पर्यटन कंपनीचे संचालक मनिष आगरवाल, रेखा वैष्णव (रा. नायगाव वेस्ट, ता. वसई, जि. पालघर) आणि आदेश थोरात (रा. कळस, विश्रांतवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जंगली महाराज रस्त्यावर निमा हॉलिडेज या पर्यटन कंपनीचे कार्यालय आहे. पर्यटन कंपनीच्या संचालकांनी फिर्यादीला स्वस्तात सहलीचे आमिष दाखविले होते. त्यांच्याकडून ९ लाख ३ हजार रुपये जमा करून घेण्यात आले. मात्र, सहलीचे आयोजन करण्यात आले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब अंतरकर तपास करीत आहेत.
