१० लाखांची लाच मागणाऱ्या तलाठी, कोतवालावर गुन्हा
जादा खोदकाम केल्याने २ कोटींच्या दंडाची भीती दाखवत लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सेनापती बापट रोडवरील इमारतीच्या पायासाठी खोदकाम करताना जादा खोदकाम झाल्याने २ कोटी रुपयांचा दंड बसेल, अशी भीती दाखवून १० लाख रुपयांची लाच मागणाऱ्या शिवाजीनगर येथील तलाठी व कोतवालाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
तलाठी आश्विनी दत्तात्रय कोकाटे (वय ३७) आणि कोतवाल महेश मधुकर मुंढे (वय ३०) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे असून, हे दोघेही शिवाजीनगर तलाठी कार्यालयात कार्यरत आहेत.
तक्रारदार हे व्यवसायाने खोदकाम ठेकेदार आहेत. त्यांच्या फर्ममार्फत सर्वे क्रमांक ९६७, सेनापती बापट रोड येथे एका व्यावसायिक प्रकल्पासाठी इमारतीच्या पायाचे खोदकाम सुरू होते. या खोदकामाचा पंचनामा तलाठी आश्विनी कोकाटे यांनी केला. तक्रारदारांनी ३२०० ब्रास जादा खोदकाम केल्याने त्यांच्यावर २ कोटी रुपयांचा दंड होऊ शकतो, असे सांगण्यात आले. तहसीलदारांकडे ‘निल पंचनामा’ अहवाल सादर करण्यासाठी तक्रारदारांकडे १० लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली.
याबाबत तक्रारदारांनी १५ जून २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर १६ जून रोजी लाच मागणी पडताळणी कारवाई करण्यात आली. या पडताळणीत तलाठी कोकाटे यांनी पंचनाम्यात ३२०० ब्रास जादा खोदकाम झाल्याचे नमूद करून तहसीलदारांकडे निल पंचनाम्याचा अहवाल सादर करण्यासाठी १० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच ही रक्कम कोतवाल महेश मुंढे याच्याकडे देण्यास सांगितल्याचेही स्पष्ट झाले.
कोतवाल महेश मुंढे यानेही तलाठी कोकाटे यांनी मागितलेली लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवून त्यांच्या लाच मागणीस प्रोत्साहन दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. मात्र, त्यानंतर सापळा कारवाई होऊ शकली नाही. तरीही लाचेची मागणी झाल्याचे सिद्ध झाल्याने दोघांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांचाही शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या पर्यवेक्षणात, पोलीस निरीक्षक आसावरी शेडगे यांनी केली.
