आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

परिमंडळ ७ मधील ७ सराईत गुन्हेगार तडीपार

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 5, 2026
Spread the love

पुणे : गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांनी परिमंडळ ७ मधील ७ सराईत गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. यामध्ये वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४, विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २ आणि चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १ गुन्हेगाराचा समावेश आहे.

वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आकाश बाळू वायकर (वय २९, रा. खांदवेनगर, लोहगाव) आणि तानाजी अर्जुन जाधव (वय २६, रा. लाडबा वस्ती, केसनंद) यांच्याविरुद्ध संघटित टोळी तयार करून जबरी चोरी करणे, दहशत पसरविणे, तोडफोड करणे, चोरी करणे तसेच घातक शस्त्रे बाळगणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत.

ओम दादाराव म्हस्के (वय १९, रा. दुबेनगर, गुरुदत्त सोसायटी, वाघोली) याच्याविरुद्ध गंभीर दुखापत करणे, दहशत पसरविणे, तोडफोड करणे तसेच बेकायदेशीरपणे घातक शस्त्रे बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत.

भारत माखन निसार (वय २९, रा. भावडी रोड, वाघोली) याच्याविरुद्ध गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी जवळ बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.

विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यश अनिल ओव्हाळ (वय २१, रा. बर्मा सेल झोपडपट्टी, लोहगाव) याच्याविरुद्ध दुखापत करणे, मारहाण करणे, दहशत पसरविणे, तोडफोड करणे तसेच घातक शस्त्रे बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत.

प्रीतम प्रफुल्ल कुलकर्णी (वय ३८, रा. साईनाथनगर, वडगावशेरी) याच्याविरुद्ध जुगार खेळणे तसेच अंमली पदार्थ विक्रीसाठी जवळ बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत.

चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सचिन राजेंद्र कापुरे (वय २६, रा. रामवाडी मेट्रो स्टेशनसमोर) याच्याविरुद्ध जबरी चोरी, गंभीर दुखापत करणे आणि मारहाण करणे असे गुन्हे दाखल आहेत.

परिमंडळ ७ च्या कार्यक्षेत्रातील १०० हून अधिक सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलिसांचे बारकाईने लक्ष असून, गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासून परावृत्त करण्यासाठी आणि गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी आणखी १०० हून अधिक गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांनी दिली.