आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पुणे रेल्वे स्टेशनच्या आवारात तरुणाचा खून

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 5, 2026
Spread the love

पुणे : दारू पिण्यावरून झालेल्या वादातून दोन ते तीन जणांनी एका तरुणाच्या डोक्यात बोथट हत्याराने वार करून त्याचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. नोकरीच्या शोधात हा तरुण पुण्यात आला होता.

नीलेश कुंडलिक नारकर (वय ४२, रा. मुंबई) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गणेश वसंत चव्हाण यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ३ ऑगस्ट रोजी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशनसमोरील पार्किंगमधील एका रिक्षामध्ये घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्टेशनसमोरील पार्किंगमध्ये एक तरुण बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने त्याला ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

शवविच्छेदन अहवालात त्या तरुणाच्या डोक्यात बोथट हत्याराने मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस, डाव्या डोळ्याच्या भुवईवर, पाठीवर तसेच छातीवर मारहाणीच्या जखमा आढळून आल्या.

सुरुवातीला या तरुणाची ओळख पटत नव्हती. मात्र, त्याच्या हातावर “नीलेश” असे गोंदलेले असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी त्याची माहिती सोशल मीडियावर प्रसिद्ध केली. ही माहिती पाहिल्यानंतर त्याच्या भावाने पोलिसांशी संपर्क साधून तो आपला भाऊ नीलेश कुंडलिक नारकर असून, नोकरीच्या शोधात पुण्यात आल्याचे सांगितले.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश वानखेडे करीत आहेत.