आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

विषारी दारू प्रकरणी ९ दारू विक्रेत्यांवर मोक्का

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 5, 2026
Spread the love

पुणे : विषारी दारू पिल्याने हडपसर व फुगेवाडी येथे २१ जणांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात विषारी दारूची विक्री करणाऱ्या ९ जणांवर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. हडपसरमधील विषारी दारू प्रकरणात चौघांचा मृत्यू झाल्यानंतर ही मोक्का कारवाई करण्यात आली आहे.

मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये दत्ता ऊर्फ भाऊ भिवराव लोंढे (रा. पांढरस्थळ, उरुळी कांचन), त्याचे साथीदार आकाश दीपक जाधव (रा. हडपसर), योगेश राजेंद्र व्हनकडे (रा. मुंढवा), राधेश्याम हरीराम प्रजापती (रा. उरुळी कांचन), कल्पेश अशोक अग्रवाल (रा. खडकी), आर्यन संजीव धोत्रे (रा. वडारवाडी), अभिषेक अरुण चौबे (रा. नवी मुंबई), अरुण जगदंबा चौबे (रा. नवी मुंबई) आणि अंकित अरुण चौबे (रा. नवी मुंबई) यांचा समावेश आहे.

टोळीप्रमुख दत्ता लोंढे व त्याच्या टोळीने गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीती, असुरक्षितता आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या टोळीने यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे केले आहेत. नवी मुंबईतून रसायने मागवून ती गावठी दारूमध्ये मिसळून विक्री केल्याने हडपसर आणि काळेपडळ परिसरातील चार जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास शासनाने सीआयडीकडे सोपविला.

पोलीस उपअधीक्षक शामराव काळे यांनी पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्फत गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांच्याकडे मोक्काचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाची छाननी करून विशेष पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांनी दत्ता लोंढे व त्याच्या साथीदारांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले.

ही कारवाई अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद, विशेष पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ आणि पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक शामराव काळे यांनी केली.