आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

भाड्याने घेतलेल्या क्रिस्टा कारचा अपहार

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 5, 2026
Spread the love

पुणे : महाबळेश्वरला जाण्यासाठी इनोव्हा क्रिस्टा कार भाड्याने घेऊन ती सुरतमार्गे वडोदरा येथे नेली. तसेच कारमधील जीपीएस आणि फास्टॅग काढून तिचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी श्रीशल नागनाथ व्हसुरे (वय ३४, रा. वेनस एन्क्लेव्ह, तुळजाभवानीनगर, खराडी) यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आवेश अमिनभाई मेमोन (वय ३६, रा. मेमोन कॉलनी, वडोदरा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २३ जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास खराडी येथील ‘हॅलो कार्स रेंटल’ कंपनीत घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची ‘हॅलो कार्स रेंटल’ नावाची कंपनी असून त्यांच्याकडे एकूण १७ कार आहेत. या कार ग्राहकांना दैनिक भाडेतत्त्वावर दिल्या जातात. आरोपी आवेश मेमोन याने महाबळेश्वर व मुंबईला जाण्यासाठी दोन दिवसांसाठी कार भाड्याने हवी असल्याचे सांगितले. त्यानुसार त्याने २३ जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता १३ हजार ९०० रुपये भरून आवश्यक कागदपत्रे सादर केली आणि दोन दिवसांसाठी इनोव्हा क्रिस्टा कार भाड्याने घेतली.

२४ जुलै रोजी सकाळी फिर्यादी यांनी जीपीएसद्वारे कारचे लोकेशन तपासले असता ती सुरतजवळ असल्याचे दिसून आले. त्यांनी आरोपीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाईल बंद होता. सायंकाळी संपर्क झाल्यानंतर आरोपीने एका दिवसाचे अतिरिक्त भाडे पाठवून दुसऱ्या दिवशी कार परत आणून देण्याचे आश्वासन दिले.

यानंतर पुन्हा जीपीएस तपासला असता कार वडोदरा येथे असून त्यातील जीपीएस यंत्रणा काढून टाकल्याचे आढळून आले. आरोपीने २९ जुलै रोजी कार परत आणून देण्याचे सांगितले. त्यानंतर पुन्हा ३ ऑगस्टपर्यंत मुदत मागितली. मात्र, त्याने अद्यापही कार परत केली नसल्याने फिर्यादी यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आवारे करीत आहेत.