लायन्स क्लब पूना गणेशखिंडचा पदग्रहण सोहळा उत्साहात
रॅडिसन हॉटेल, गोवा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला पदस्थापना समारंभ
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : रॅडिसन हॉटेल, गोवा येथे लायन्स क्लब ऑफ पूना गणेशखिंडच्या लायन वर्ष 2026-27 च्या नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालक मंडळाच्या पदस्थापना समारंभाचे भव्य आयोजन करण्यात आले. उत्साह, सन्मान आणि सेवाभावाच्या वातावरणात हा सोहळा पार पडला.
समारंभात लायन विकास अग्रवाल यांनी क्लबच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत लायन विक्रांत अग्रवाल यांनी सचिव, लायन संजय खंडेलवाल यांनी कोषाध्यक्ष, तर नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या संचालक मंडळातील सदस्यांनीही आपल्या पदांची शपथ घेतली.
या पदस्थापना समारंभात इंस्टॉलेशन ऑफिसर म्हणून लायन द्वारका जालान यांनी अध्यक्ष, पदाधिकारी आणि संचालक मंडळातील सदस्यांना पद व कर्तव्यनिष्ठेची शपथ देत यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच लायन विजय भंडारी यांच्या हस्ते क्लबच्या नव्या सदस्यांचा इंडक्शन सोहळा संपन्न झाला. मागील कार्यकाळात केलेल्या निःस्वार्थ समाजसेवा व उल्लेखनीय सामाजिक योगदानाची दखल घेत बी. जे. भंडारी ट्रस्टच्या वतीने लेडी लायन संगीता गोपालकृष्ण अग्रवाल यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या समारंभाचे इंस्टॉलेशन चेअरपर्सन म्हणून लायन हेमंत बाफना यांनी जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाचे संयोजन लायन शाम खंडेलवाल, लायन रवि कुस्तुले आणि लायन योगेश पोद्दार यांनी केले.
तर सोनल राजौरे आणि प्रशांत अग्रवाल यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले. यावेळी क्लबचे निवर्तमान अध्यक्ष (IPP) लायन गोपालकृष्ण अग्रवाल आणि निवर्तमान सचिव जिनेंद्र लोढा यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला.
अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर लायन विकास अग्रवाल यांनी आपल्या मनोगतात सेवा, समर्पण आणि सामाजिक उत्तरदायित्वाला सर्वोच्च प्राधान्य देत क्लबला नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प व्यक्त केला.
सर्व सदस्यांनी एकत्रितपणे विविध समाजोपयोगी उपक्रम प्रभावीपणे राबवावेत, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी क्लबच्या फर्स्ट लेडी लायन टीना अग्रवाल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या भव्य पदस्थापना समारंभाला क्लबचे सदस्य, माजी पदाधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच आमंत्रित सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. लायनवादाची भावना, सौहार्द आणि सेवाभाव यांचे दर्शन घडविणारा हा सोहळा अत्यंत यशस्वी वातावरणात संपन्न झाला.
