बाणेरमध्ये जागामालकाचा चाकूने भोसकून खून
एकतर्फी प्रेमातून घडला प्रकार : आरोपीला पकडून केले पोलिसांच्या हवाली
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : एकतर्फी प्रेमातून झालेल्या वादातून एका व्यक्तीने जागामालकावर चाकूने वार करून त्याचा खून केल्याची घटना समोर आली आहे. बाणेरमधील ब्रह्मकुमारी मेडिटेशन सेंटरसमोर गुरुवारी सकाळी ही घटना घडली. त्यानंतर पळून जात असलेल्या आरोपीला नागरिकांनी पकडून चतु:श्रृंगी पोलिसांच्या हवाली केले.
घनश्याम संजय रायकर (वय ४९, रा. ब्रह्मकुमारी मेडिटेशन सेंटरसमोर, बाणेर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सोलमन शेडगे (वय ५२, रा. फिरस्ता) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घनश्याम रायकर यांच्या बाणेर येथील गल्लीतील सर्व जागा त्यांच्या मालकीची आहे. त्यांनी २५ वर्षांपूर्वी तेथे ब्रह्मकुमारी मेडिटेशन सेंटर उभारले आहे. सोलमन शेडगे याचे लग्न झाले असून तो घरच्यांपासून वेगळा राहतो. जेथे काम मिळेल तेथे तो काम करून राहतो.
ब्रह्मकुमारी मेडिटेशन सेंटरमधील एका महिलेवर शेडगे याचे एकतर्फी प्रेम होते. तो गेल्या एका वर्षापासून त्या महिलेला त्रास देत होता. गुरुवारी सकाळी तो चाकू घेऊन तेथे आला. त्यावेळी जागामालक घनश्याम रायकरही तेथे उपस्थित होते. त्यांच्यात वादावादी झाली. शेडगे याने चाकू दाखविल्यानंतर रायकर तेथून पळून जाऊ लागले. त्यावेळी शेडगे याने त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी झाल्याने रायकर तेथेच कोसळले.
हा सर्व प्रकार पाहून नागरिक घटनास्थळी जमा झाले. त्यांनी शेडगे याला पकडून चतु:श्रृंगी पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना बाणेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने बाणेर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
