पोलीस अंमलदार निलंबित
वकिलाला पोलीस ठाण्याच्या आवारात मारहाण : पोलीस उपायुक्तांचा आदेश
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : ट्रिपल सीट जाणाऱ्या एका वकिलाला हटकल्याचा राग मनात धरून त्याने पोलीस अंमलदाराला “तुमची वर्दी उतरवतो,” अशी धमकी दिल्यानंतर त्याला पोलीस ठाण्याच्या आवारात शिवीगाळ करत डोक्यामागे तसेच तब्बल २२ कानाखाली मारणाऱ्या पोलीस अंमलदाराला पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार यांनी निलंबित केले आहे.
नितीन सोमनाथ पोंधे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. ते लोणीकंद पोलीस ठाण्यात कार्यरत होते. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
नितीन पोंधे हे पेरणे येथे मार्शल म्हणून कर्तव्यावर होते. ३१ जुलै रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास म्हसोबा मंदिराजवळ एक कंटेनर बंद पडल्याने ते वाहतूक सुरळीत करण्याचे काम करत होते. त्यावेळी अॅड. साहिल दिलावर शेख (वय २६, रा. कोरेगाव भीमा) हे मोटारसायकलवर ट्रिपल सीट प्रवास करत होते. पोंधे यांनी त्यांना हटकले. त्याचा राग आल्याने साहिल शेख यांनी आपण वकील असल्याचे सांगत, “तुमची वर्दी उतरवतो,” अशी धमकी दिली. त्यानंतर पोंधे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अॅड. साहिल शेख यांच्याविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात अदखलपात्र तक्रार दाखल करण्यात आली.
दरम्यान, अॅड. साहिल शेख यांनीही पोलीस अंमलदार नितीन पोंधे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीत पोंधे यांनी शिवीगाळ करून मारहाण केली, मोबाईल हिसकावून घेतला तसेच डोक्यामागे आणि २२ कानाखाली मारल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या तक्रारीची चौकशी करताना पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये पोलीस ठाण्याच्या आवारात पोंधे हे साहिल शेख यांना हाताने मारहाण करत असल्याचे स्पष्ट दिसून आले. त्यानंतर साहिल शेख यांच्या तक्रारीवरून पोंधे यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अंमलदार नितीन पोंधे यांचे वर्तन पोलीस दलाच्या शिस्तीचे उल्लंघन करणारे, अशोभनीय, बेशिस्त आणि बेजबाबदार असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या वर्तनामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन होण्याची शक्यता असल्याने पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार यांनी त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
