आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

भाईचा बर्थडे साजरा करणारा गजाआड

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 7, 2026
Spread the love

पुणे : येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा करण्यासाठी येरवडा जेलच्या भिंतीजवळ फटाके उडवणाऱ्या गुन्हेगाराला येरवडा पोलिसांनी जेरबंद केले आहे.

शंकर बाळासाहेब भालके (वय १९, रा. चव्हाणनगर, धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

सुलतान सय्यद हा गुन्हेगार सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याचा २५ जुलै रोजी वाढदिवस होता. त्यानिमित्त त्याचे साथीदार शंकर भालके, केतन रवींद्र हातागळे (रा. पीएमसी कॉलनी, घोरपडी पेठ) व इतर साथीदार येरवडा जेलच्या भिंतीजवळ गेले. त्यांनी रस्त्यावर आकाशात उडणारे फटाके फोडून त्याचा व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ रवींद्र हातागळे याने इन्स्टाग्रामवर अपलोड केला.

पोलीस अंमलदार अमित शिंदे यांच्याकडे कारागृहातून जामिनावर सुटलेल्या आरोपींची माहिती घेणे तसेच कारागृह परिसरात निगराणी ठेवण्याची जबाबदारी आहे. ते २८ जुलै रोजी सोशल मीडियावर पाहणी करत असताना त्यांना “SULTAN BHAI HAPPY BIRTHDAY”, “KING OG UPPER YERWADA CENTRAL JAIL”, “HAPPY BDAY SULTAN BHAI”, “VK LOVERS” असा मजकूर असलेला फटाके उडवतानाचा व्हिडिओ आढळला. त्यानंतर पोलिसांनी चौकशी करून गुन्हेगारांचे उदात्तीकरण केल्याप्रकरणी शंकर भालके याला अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनिकांत, सहायक पोलीस निरीक्षक सुनील वैजापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक केशव दिंडे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड, पोलीस हवालदार पिलाणे, मुकुंद कोकणे तसेच पोलीस अंमलदार शैलेश वाबळे, बालाजी सोगे, संदीप जायभाये, नटराज सुतार, गणेश पालवे, साईनाथ म्हस्के, सोमनाथ गायकवाड आणि अनिल मन्हाळकर यांनी केली.