आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करून ११ लाखांच्या सोनसाखळ्या चोरीस

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 7, 2026
Spread the love

पुणे : कार्यालय बंद करून मर्सिडीज कारने घरी जाणाऱ्या जमीन खरेदी-विक्री व्यवसायिकावर मोटारसायकलवरून आलेल्या तिघा चोरट्यांनी गोळीबार केला. त्यातील एक गोळी मर्सिडीजच्या काचेतून आरपार जाऊन या व्यावसायिकाच्या गालात जाऊन अडकली. चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ११ लाख रुपये किमतीच्या, २२ तोळे वजनाच्या दोन सोनसाखळ्या जबरदस्तीने हिसकावून नेल्या.

संतोष ज्ञानोबा गावडे (वय ५०, रा. गावडेवाडी, शिरसवाडी) असे जखमी झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. ही घटना गावडेवाडी, शिरसवाडी परिसरातील पंडित गावडे यांच्या बंगल्यासमोर बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. याप्रकरणी दत्तात्रय महादेव गावडे (वय ५०, रा. गावडेवाडी, शिरसवाडी) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष गावडे हे हवेली तालुक्यात जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. वाडे बोल्हाई चौकात त्यांचे कार्यालय आहे. बुधवारी रात्री ते कार्यालय बंद करून मर्सिडीज कारने घरी जात होते. शिरसवाडी-गावडेवाडी रस्त्यावरील पंडित गावडे यांच्या घराजवळ दोन मोटारसायकलींवरून तिघेजण आले. त्यांनी त्यांची गाडी थांबविण्यास भाग पाडून त्यांच्यावर गोळीबार केला. त्यातील एक गोळी मर्सिडीजच्या काचेतून आरपार जाऊन त्यांच्या गालात शिरली. ते जखमी झाले असताना त्यांच्या गळ्यातील ११ लाख रुपये किमतीच्या, २२ तोळे वजनाच्या दोन सोनसाखळ्या जबरदस्तीने हिसकावून आरोपी पसार झाले.

गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. त्यांनी संतोष गावडे यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्यांच्या गालात अडकलेली गोळी काढली असून, त्यांची प्रकृती सुधारत आहे.

हल्लेखोरांचा नेमका उद्देश काय होता, त्यांचा हेतू हत्या करण्याचा होता की केवळ लुटीचा, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपींना अटक झाल्यानंतरच याचा उलगडा होऊ शकणार आहे. हल्लेखोरांचा अद्याप माग काढता आलेला नसून, सहायक पोलीस निरीक्षक शेवाळे पुढील तपास करीत आहेत.