आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

२ ऑक्टोबरपासून मार्केट सेसविरोधात राज्यव्यापी असहकार आंदोलन

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 7, 2026
Spread the love

कोल्हापूर : कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून (एपीएमसी) बाजार समितीच्या आवारात तसेच आवाराबाहेर आकारण्यात येणारा मार्केट सेस तातडीने रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीने २ ऑक्टोबरपासून राज्यव्यापी असहकार आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनात राज्यातील सुमारे पाच लाख व्यापारी सहभागी होणार असून, “ना सेस भरणार, ना सेस वसूल करणार” अशी भूमिका व्यापाऱ्यांनी जाहीर केली आहे. मार्केट सेस रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

कोल्हापूर येथे झालेल्या राज्यव्यापी व्यापारी परिषदेत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. परिषदेनंतर दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी सांगितले की, मार्केट सेसच्या नावाखाली व्यापाऱ्यांवर दुहेरी आर्थिक भार पडत आहे.

जीएसटी भरत असतानाही स्वतंत्रपणे मार्केट सेस आकारला जात असल्याने व्यापाऱ्यांसह ग्राहक आणि शेतकरी यांनाही त्याचा फटका बसत आहे.

त्यामुळे शासनाने हा अन्यायकारक सेस तातडीने रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली. राजेंद्र बाठिया यांनी पुढे सांगितले की, एलबीटी रद्द केल्यानंतर ज्या पद्धतीने शासन स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक मदत देते, त्याच धर्तीवर बाजार समित्यांनाही जीएसटीमधील महसुलातून निधी देऊन मार्केट सेस पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घ्यावा.

तसेच बाजार समितीचे परवाने ऑनलाइन पद्धतीने देण्यात यावेत. अन्यथा व्यापारी परवान्यांचे नूतनीकरण करणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.

आंदोलनाच्या तयारीसाठी राज्यभरातील लोकप्रतिनिधी, व्यापारी संघटना आणि बाजार समित्यांना निवेदने देण्यात येणार असून, समाजमाध्यमांच्या माध्यमातून व्यापाऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.

शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास २ ऑक्टोबरपासून राज्यभर असहकार आंदोलन सुरू होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यव्यापी व्यापारी परिषदेस विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनाला राज्यभरातील व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.