आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

व्यावसायिकावर गोळीबार करणारे दरोडेखोर जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 8, 2026
Spread the love

पुणे : जमीन खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकाच्या कारवर गोळीबार करून त्यांच्याकडील ११ लाख रुपयांचे २२ तोळ्यांचे दागिने लुटणाऱ्या दरोडेखोरांना मध्य प्रदेशातील उज्जैन परिसरातून अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून देशी बनावटीची तीन पिस्तुले, सोन्याचे दागिने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरोडेखोरांविरुद्ध उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि नेपाळमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, लूटमार असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

अविनाश किशनचंद त्रिपाठी (वय ४३, सध्या रा. क्रिस्टन सोसायटी, बकोरी, ता. हवेली, मूळ रा. उत्तर प्रदेश), सुरेंद्रपाल रामचंद्र पाल (वय ३२, रा. भिलवल, जि. बाराबंकी, उत्तर प्रदेश) आणि मोहम्मद शोएब वसीम खान (वय ३७, रा. आझादनगर, जि. बाराबंकी, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

५ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील शिरसवाडी परिसरातून व्यावसायिक मर्सिडिस कारमधून निघाले होते.

त्या वेळी आरोपींनी कार अडवून चालकावर देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार करून २२ तोळ्यांचे दागिने लुटले. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी प्रतिबंध विभागाकडून तपास सुरू करण्यात आला. तांत्रिक तपासात आरोपी मध्य प्रदेशात पसार झाल्याची माहिती मिळाली.

तांत्रिक तपासात आरोपी उज्जैन परिसरात असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांचे पथक उज्जैनला रवाना झाले. शुक्रवारी तिघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

तिघांना उज्जैनमधील न्यायालयाकडून प्रवासी कोठडी (ट्रान्झिट रिमांड) मिळवण्यात आली आहे. तिघांना घेऊन पोलिसांचे पथक पुण्याकडे रवाना झाले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड, सहायक पोलीस निरीक्षक मोहसीन पठाण, पोलीस हवालदार परेश सावंत, पोलीस अंमलदार संदीप येळे, विनायक येवले, प्रफुल्ल मोरे, विक्रांत सासवडकर, पांडुरंग नाणेकर आणि राहुल इंगळे यांनी केली. त्यांना दरोडा व वाहनचोरी पथकाने तांत्रिक सहाय्य केले.