आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

देशसेवेची आवड ज्येष्ठ महिलेला पडली ८ लाखांना

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 8, 2026
Spread the love

पुणे : सोशल मीडियावर एआयच्या माध्यमातून केंद्रीय मंत्र्यांच्या नावाने फेक व्हिडिओ व्हायरल झालेले दिसून येतात. त्यात भारत सरकारच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केलेले असते. देशसेवेची आवड असलेल्या एका ६२ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिक महिलेने त्याला प्रतिसाद दिल्यावर तिची ८ लाख ९ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

याबाबत एका ६२ वर्षांच्या महिलेने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २२ डिसेंबर २०२५ ते २४ मे २०२६ दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा फेक व्हिडिओ एआयमार्फत तयार करून तो सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

फिर्यादी फेसबुक पाहत असताना त्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला. त्यात भारत सरकारच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करा. त्यामध्ये देशाला खूप फायदा होईल, यामध्ये सहभाग नोंदवा.

ही गुंतवणूक सुरक्षित आहे. आपले योगदान अमूल्य आहे. आम्ही दिलेला फॉर्म तात्काळ भरा, असे आवाहन केले होते. त्यानंतर त्यांनी गुंतवणूक करण्यासाठी व्हिडिओवर क्लिक केले.

त्यात एक अ‍ॅप ओपन झाले. त्यात शेअर मार्केट दिसत होते. त्यांना टेलिग्राम चॅनेलवर अ‍ॅड करून घेण्यात आले. या टेलिग्राम चॅनेलचा अ‍ॅडमिन सुरेश याने कॉल करून त्यांची माहिती घेतली. त्यांना टेलिग्राम अ‍ॅप ओपन करण्यास सांगितले.

त्यांना वेळोवेळी शेअर मार्केटची माहिती देऊन पैसे गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात चांगला परतावा मिळतो, असे आमिष दाखवले.

वेळोवेळी वेगवेगळी बँक खाती देऊन पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. त्यांनी एकूण ८ लाख ९ हजार १०६ रुपयांची गुंतवणूक केली.

त्यांनी जेव्हा सर्व पैसे काढायचे आहेत, असे सांगितले, तेव्हा त्यांना अजून पैसे भरण्यास सांगितले. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलीस निरीक्षक कारोटे तपास करीत आहेत.