आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

९० लाखांचे सोन्याच्या दागिन्यांचे पार्सल घेऊन डिलिव्हरी बॉय पसार

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 8, 2026
Spread the love

पुणे : सराफ व्यापाऱ्यांचे सोन्या-चांदीचे दागिने कुरिअर सेवेद्वारे वेगवेगळ्या शहरांत पोहोचवले जातात. ९० लाख रुपयांचे दागिने असलेले १४ पार्सल घेऊन मुंबईला जाणाऱ्या डिलिव्हरी बॉयने ही पार्सल मुंबईत पोहोचविण्याऐवजी वाटेत बसमधून उतरून पळून गेल्याचा प्रकार घडला आहे.

याबाबत जितेंद्र ऋषिकेश सिंह (रा. लक्ष्मी अपार्टमेंट, राष्ट्रभूषण चौक, घोरपडी पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी विशाल सत्यपाल चौहान (वय २०, रा. मुंबई, मूळ रा. नरोरा, जि. इटाह, उत्तर प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ५ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे साडेपाच वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र सिंह यांचा एसजीएलजेपी लॉजिस्टिक प्रा. लि. या नावाने कुरिअरचा व्यवसाय आहे. ते ग्राहकांचे सोने व पैसे कुरिअरने पाठविण्याचे काम करतात. महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर व अहिल्यानगर येथे त्यांची कार्यालये आहेत. प्रत्येक कार्यालयामध्ये काम करण्यासाठी मुले ठेवली आहेत. पुणे येथे रजनिश शर्मा हा कामास असून, मुंबई कार्यालयात विशाल चौहान हा कामाला आहे. त्याला दरमहा १२ हजार ३०० रुपये पगार दिला जातो.

इतक्या तुटपुंज्या पगारामध्ये ते मुंबईहून पुण्याला येतात आणि परत मुंबईला जातात. ४ ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथील ६ सराफ, पुण्यातील ५ सराफ, जळगाव, जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथील प्रत्येकी एक, अशी एकूण ९० लाख ३३ हजार रुपयांची १४ सोन्याची बिस्किटे व दागिन्यांची पार्सल होती.

हे पार्सल घेऊन ५ ऑगस्ट रोजी पहाटे साडेपाच वाजता रजनिश शर्मा याने विशाल चौहान याला स्वारगेट एसटी बसस्थानकावर सोडले. तो मंत्रालयाच्या बसने मुंबईला गेला. बस सकाळी ९ वाजता मुंबईला पोहोचली. मात्र, विशाल चौहान हा काही पोहोचला नाही. त्याला फोन केल्यावर त्याचा फोन बंद लागत होता.

नियमित ये-जा करत असल्याने एसटीच्या चालक-वाहकांशी त्यांची ओळख झाली आहे. फिर्यादी यांनी बस वाहकाला फोन केला. तेव्हा त्याने सांगितले की, तुमचा कामगार विशाल चौहान हा वाकड पुलाखाली उतरला आहे. त्यांच्या कार्यालयातील रजनिश शर्मा यानेही विशाल चौहान याचा शोध घेतला. परंतु, त्याच्याशी संपर्क न झाल्याने शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जर्‍हाड तपास करीत आहेत.