आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

हाऊझ कम्युन बार अ‍ॅन्ड ईट्रे पबच्या ८ जणांना अटक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 10, 2026
Spread the love

पुणे : विमाननगर येथील ऐरोस्पेस मॉलमधील द हाऊझ कम्युन बार अ‍ॅन्ड ईट्रे या पबमध्ये संगीत पार्टीचे आयोजन करून पहाटेपर्यंत मद्यपुरवठा करून नियमबाह्य पद्धतीने व्यवसाय सुरू ठेवल्याबद्दल पोलिसांनी दोन मॅनेजरसह आठ जणांना अटक केली. तेथील १ लाख ६७ हजार रुपयांची दारू व ७५ हजार रुपयांची साऊंड सिस्टीम जप्त केली आहे.

याबाबत पोलीस उपनिरीक्षक आशिष नारायण जाधव यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हॉटेल मालक मंगेश उत्तम धिमधिमे (रा. धानोरी), सुमित रोहीदास गोटे (वय ३०, रा. येरवडा), नूर हुसेन शेख (वय ३०, रा. विमाननगर), सोनाली विलास पंडित (वय ३२, रा. उंड्री), अनिकेत निवृत्ती मांडकीकीर (वय २१, रा. धानोरी), सुनीता जैन वर्मा (वय २५, रा. लोहगाव), अनंत जगल गायकवाड (वय ३१, रा. खडकी), शाहनूर अमीनुद्दीन काझी (वय ३५, रा. बिबवेवाडी ओटा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

विमाननगर येथील ऐरोस्पेस मॉलमधील द हाऊझ कम्युन बार अ‍ॅन्ड ईट्रे हा पब पहाटेपर्यंत सुरू असून, यात अंमली पदार्थांचा वापर केला जात असल्याची गुन्हे शाखेला माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी या पबवर पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. मोठमोठ्या आवाजात कर्णकर्कश डी.जे. लावून परिसरातील नागरिकांना त्रास देत होते.

यावेळी तेथे ६३ तरुण व २६ तरुणी असे ८९ ग्राहक डान्स फ्लोअरवर नाचत होते. त्यांना पहाटेपर्यंत मद्यपुरवठा केला जात होता. पोलिसांनी या सर्व ग्राहकांची तपासणी केली. पबमधील १ लाख ६७ हजार रुपयांची दारू तसेच साऊंड सिस्टीम जप्त केली आहे.

शासनाने दिलेल्या वेळेचे व नियमांचे उल्लंघन करून व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या हॉटेलमालकासह व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत माने तपास करीत आहेत.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अविनाश माने, जीवन माने, तृप्ती सोनवणे यांच्या सूचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक पवार, जाधव, दिग्विजय चौगुले, पोलीस अंमलदार सरगर, चव्हाण, मंडलिक, नेवसे, तारु, तुपसुंदर, शिंदे, राठोड, खराडे, साबळे, केगले, रणपिसे, रेणुसे, राठोड, बांदल, शेलार यांनी केली आहे.