आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मुंबई पब्लिक स्कूलमध्ये सायबर सुरक्षेचे धडे

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 10, 2026
Spread the love

मुंबई : डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि त्यासोबत बदलत जाणारे सायबर गुन्ह्यांचे स्वरूप लक्षात घेता विद्यार्थी आणि तरुणांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे गरजेचे झाले आहे. याच उद्देशाने क्विक हील फाउंडेशन आणि पाटकर-वर्दे कॉलेज यांच्या सहकार्याने मुंबई पब्लिक स्कूल, बोरिवली पश्चिम (पोईसर शाखा) येथे सायबर सुरक्षा जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले.

क्विक हील फाउंडेशनच्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या प्रमुख अभियानांतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. यंदाच्या अभियानाची संकल्पना ‘माय डेटा, माय रिस्पॉन्सिबिलिटी’ (माझा डेटा, माझी जबाबदारी) अशी असून, वैयक्तिक माहिती आणि डिजिटल ओळख सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारावी, हा महत्त्वपूर्ण संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.

या विशेष सत्रात पाटकर-वर्दे कॉलेजचे प्रशिक्षित विद्यार्थी आणि सायबर वॉरियर्स शिल्पीशिवम सिंग व रिया मिश्रा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

त्यांनी सायबर विश्वातील विविध धोके, ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार आणि त्यापासून सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली.

यावेळी वैयक्तिक डेटा संरक्षण व गोपनीयता, ऑनलाइन फसवणूक आणि स्कॅम ओळखण्याच्या पद्धती, सोशल मीडियाचा सुरक्षित व जबाबदार वापर तसेच सायबर गुन्ह्यांची तक्रार कशी आणि कुठे करावी, यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

प्रत्यक्ष उदाहरणे आणि संवादात्मक पद्धतीने सत्र घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मुंबई पब्लिक स्कूल, बोरिवली पश्चिम (पोईसर)च्या प्रतिनिधींनी या उपक्रमाचे कौतुक केले.

आजची तरुण पिढी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असल्याने त्यांना व्यावहारिक डिजिटल साक्षरता आणि सायबर सुरक्षेचे ज्ञान देणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

शाळेत हा महत्त्वपूर्ण जनजागृती उपक्रम राबविल्याबद्दल पाटकर-वर्दे कॉलेजचे विद्यार्थी सायबर वॉरियर्स आणि क्विक हील फाउंडेशनचे आभारही व्यक्त करण्यात आले.

‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या अभियानाच्या माध्यमातून क्विक हील फाउंडेशन आणि पाटकर-वर्दे कॉलेज जबाबदार आणि सायबर-जागरूक नागरिकांची नवी पिढी घडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत.

सुरक्षित डिजिटल सवयी अंगीकारून युवकांनी अधिक सुरक्षित ऑनलाइन जीवन जगावे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.