आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

रेल्वेच्या बुकिंग क्लार्कला चाकूने जीवे मारण्याचा प्रयत्न करून जबरी चोरी करणाऱ्या तिघांना बंडगार्डन पोलिसांनी डोंबिवलीहून केले जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 25, 2026
Spread the love

पुणे : पुणे रेल्वे स्टेशनवरील सिनिअर बुकिंग क्लार्कला मध्यरात्रीच्या सुमारास चाकूने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करत, त्याच्याकडील रोकड, मोबाईल आणि सोन्याचे दागिने चोरून नेणाऱ्या तिघा चोरट्यांना बंडगार्डन पोलिसांनी डोंबिवलीहून जेरबंद केले आहे.

जितेंद्र मोतीराम राठोड (वय २४, रा. रोकडी, ता. चाळीसगाव, जि. जळगाव, सध्या रा. मुंब्रादेवी चाळ, भोपरगाव कमानी, डोंबिवली), ईश्वर गोरख चव्हाण (वय २३, रा. दसनाबाद, ता. कन्नड, जि. संभाजीनगर) आणि अजय मदन चव्हाण (वय ३५, तिघेही सध्या रा. मुंब्रादेवी चाळ, भोपरगाव कमानी, डोंबिवली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत कॅलविन सोलोमन गायला (वय २९, रा. धायरकर कॉलनी, मुंढवा) यांनी फिर्याद दिली होती. ते १८ ऑगस्ट रोजी रात्री १ वाजता तिकीट विक्रीचे काम करत असताना दोघा चोरट्यांनी त्यांच्यावर चाकूने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

त्यांच्याकडील रोख रक्कम, दोन मोबाईल आणि सोन्याची चैन जबरदस्तीने काढून घेऊन चोरटे पळून गेले होते. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी पुणे रेल्वे स्टेशन ते डोंबिवली दरम्यानचे १५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून आरोपींपर्यंत पोहोचले. तिघांना अटक करण्यात आली.

त्यांच्याकडून पोलिसांनी चोरी केलेली रोख रक्कम आणि दोन मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. न्यायालयाने आरोपींना २५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक विनोद सलगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल पवार, पोलीस अंमलदार प्रदीप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, महेश जाधव, निलेश पालवे, ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे, शिवाजी सरक, ज्ञानेश्वर गायकवाड तसेच पुणे आरपीएफ गोपनीय शाखेचे पोलीस अंमलदार आण्णासाहेब पाखरे, स्वप्नील धनसेर आणि युवराज गायकवाड यांनी केली आहे.