कौटुंबिक वादातून कसबा पेठेत गोळीबार, पती झाले जखमी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कौटुंबिक वादातून कसबा पेठेत गोळीबाराची घटना सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. त्यात पती जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
अभिजित शंकर शिंगोटे (वय ३५, रा. कसबा पेठ, काळभैरवनाथ मंदिराजवळ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित शिंगोटे व त्यांच्या पत्नीमध्ये वादविवाद होत होते.
आज सकाळी ते घरात असताना त्यांच्यात पुन्हा वाद झाला. या वादातून अभिजित शिंगोटे यांनी गोळी झाडून घेतली. गोळी त्यांच्या खांद्याला लागली असून त्यात ते जखमी झाले आहेत.
त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस त्यांच्या राहत्या घरी पोहोचले. तेथे रक्त सांडलेले दिसून येत होते. तसेच पिस्तूल व एक पुंगळी पोलिसांना आढळून आली. त्यांनी ती ताब्यात घेतली आहे.
अभिजित यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतल्याचे त्यांची पत्नी सांगत आहे. अभिजित यांच्यावर उपचार सुरू असल्याने त्यांचा जबाब अद्याप नोंदविण्यात आलेला नाही.
दोघेही पती-पत्नी वेगवेगळे सांगत असून फरासखाना पोलीस त्यांच्या म्हणण्याची सत्यता पडताळून पाहत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी सांगितले.
