आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मंगळसूत्र हिसकावणाऱ्या महिलेला अटक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 24, 2026
Spread the love

पुणे : तुळशीबागेत ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने ओढून चोरून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. ज्येष्ठ महिलेच्या हाताला हिसका देऊन पुढे जाऊन त्यांच्या सुनेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या या महिलेला त्यांनी धाडसाने पकडून पोलिसांच्या हवाली केले.

लक्ष्मी प्रकाश सारवान (वय ५०, रा. कोंढवा) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत मंगल भानुदास भाडळे (वय ६०, रा. बिबवेवाडी) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ही घटना तुळशीबागेतून काका हलवाई चौकाकडे जात असताना सायली पूजा साहित्य दुकानासमोर रविवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी काही महिलांसोबत साखरपुड्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी आधी रविवार पेठेत गेल्या होत्या.

तेथून त्या तुळशीबागेत आल्या. तुळशीबागेत एका महिलेने फिर्यादी यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तिचा हात पकडला.

तेव्हा तिने हिसका देऊन पुढे गेली. फिर्यादी तिच्या मागोमाग जात असताना पुढे गेलेल्या त्यांच्या सुनेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न या महिलेने केला. तेव्हा त्यांनी तिला पकडले.

ती त्यांच्याबरोबर वाद घालू लागली. त्यामुळे लोक जमा झाले. त्याचवेळी तुळशीबागेत गस्त घालणारे पोलीस तेथे आले. महिलांनी तिला पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी तिला अटक केली असून, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे तपास करीत आहेत.